विनया देशपांडे, मुंबई 5 जुलै: राज्यात कोरोना व्हायरसने विळखा घातलेला असताना आता राजकीय वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी गृहमंत्रालयाने केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवली असून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला अशी चर्चा आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 जुलैला या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. हे सर्व अधिकारी हे मुंबई पोलीस दलातले असून DCP दर्जाचे आहेत. आज या सर्व 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द करण्यात आलेत आणि त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलं आहे.
राज्य सरकार सध्या कोरोनाविरुद्ध निकराची लढाई लढत आहे. त्यात पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं याला वेगळं महत्त्व आहे. मात्र हा मोठा निर्णय हा परस्पर घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
हे वाचा - भाजप ज्येष्ठ नेत्याच्या रथाचा सारथी अत्यवस्थ, मदतीला धावला राष्ट्रवादीचा नेता!
त्यानंतर तातडीने नवा आदेश काढत या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दणका समजला जातो. त्यामुळे राजकीय वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
संपादन - अजय कौटिकवार