बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले, दिला कडक इशारा

बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले, दिला कडक इशारा

सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात.

  • Share this:

मुंबई,16 ऑक्टोबर : 'बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

'राज्यातील कोविड – 19 चे संकट मोठे असून या संकटकाळात सिेनमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे जरी खरे असले तरी महाराष्ट्राने पुनश्च: हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरू केले.  राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरू करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे, हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही', असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच, 'सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरणात प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करणे, सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रेक्षक असणे याबाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे.  एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे हे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आताचा काळ सिनेमागृहे सुरू करण्यासाठी महत्त्वाचा - अमित देशमुख

दसरा, दिवाळी, नाताळ असे लागोपाठ येणारे सण यामुळे या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली होती. आता सिनेमागृहे सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी येतील, त्यामुळे आताचा काळ हा महत्त्वाचा आहे. परंतु, सिनेमागृहे सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची काळजी यालाच प्राधान्य असणार आहे. सिनेमागृहे सुरू झाल्यामुळे या क्षेत्राला गती मिळणार आहे, असं मंत्री अमित देशमुख म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: October 16, 2020, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading