महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय, पण.., मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय, पण.., मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

मी घरीच बसून काम करतोय, असा आरोप होतोय. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट हे कायम आहे. हे संकट असताना राजकीय वादळ उठत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच, लोकल सेवा, रेस्टॉरंट सुरू करण्यात येईल, याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी  पुन्हा राजकारण सुरू केले आहे.  महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी  मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

आता सारे काही खुले करतो आहोत म्हणजे काही जणांनी पुनश्च राजकारण सुरू केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून नक्की बोलेल. पण आज माझ्या दृष्टीने कोरोना महत्वाचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र सरकार खंबीरपणे पुढे चालले आहे. कोरोना अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो  आहे.  मी पूर्वी म्हटले होते की, तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. यात आता मी थोडा बदल करून तुम्ही थोडी जबाबदारी घ्या, असे आवाहन करतो आहे आणि ती तुम्ही घेतलीच पाहिजे. महाराष्ट्रात महिनाभर एक मोहिम माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावाने राबविली जाईल.  यामध्ये जात,पात, धर्म पक्ष बाजूला सारून आपण सर्वांनी सहभागी व्हावे. महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली स्वत:ची आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

कोरोनाचे औषध कधी येणार ? असा प्रश्न विचारला जातोय पण डिसेंबर जानेवारीपर्यंत ते काही होणार नाही असे दिसते. तोपर्यंत सर्वांनी सदा सर्वदा मास्क लावावा , गर्दी करायची नाही. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दीत अंतर ठेवायचे, हात सतत धूत राहणे. सध्या ही  त्रिसूत्री हाच विषाणूपासून लांब राहण्याचा उपाय आहे.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी मध्ये आपल्याला अवघड वाटेल पण अशक्य नाही. पण १२ कोटी जनतेची आरोग्य चौकशी करतो आहोत. आपला प्रयत्न असा आहे की,  महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दोन वेळा तरी आरोग्य टीम जाईल. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या वॉर्डची जबाबदारी घ्या. लोकप्रतिनिधीनी मतदारसंघांची जबाबदारी घ्यावी. घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल. आपल्याकडे ५० ते ५५ वयापेक्षा मोठे कोण आहेत? व्याधी आहेत का, प्रत्येकाची ऑक्सिजन पातळी काय तसेच इतरही आरोग्याच्या बाबी पाहिल्या जातील.  एकूणच काय चेस दी व्हायरस मोहिमेचेच हे रूप आहे', अशी माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ आहे. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे.

- जागतिक संघटनेनं इशारा दिला आहे, कोरोनाची लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे

- महाराष्ट्रात येत्या १५ तारखेपासून मोहिम राबवतोय. या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी जात धर्म हे सोडून सहभागी झाले पाहिजे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करत आहोत.

- सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे लागणार आहे.

- १२ कोटी जनतेची आरोग्य तपासणी करणे, जरा अवघड काम आहे. पण तरीही प्रत्येक घराची दोनदा चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची टीम येईल. जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यावी

- घराघरात जाऊन ५० ते ५५ वयापेक्षा जास्त व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहे, यात काही दोष आढळून आला तर आरोग्य टीम इलाज सुरू करेल.

- सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे

- घरी आल्यावर बुट बाहेर काढणे, हात-पाय धुणे, कपडे बाहेर काढून ठेवणे आणि त्यानंतर घरात प्रवेश करावा

- समोरासमोर बोलण्याचे टाळा, मास्कचा वापर करा

- लोकल सेवा सुरू केली आहे, त्यात लवकरच वाढ करणार आहोत,  

- जिम रेस्टॉरंट, लवकरच सुरू करणार आहोत.

- मी घरीच बसून काम करतोय, असा आरोप होतोय. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे. आणि काम होत आहे. आरोप करून काहीही फायदा नाही.

- इतरांसमोर जेवताना समोरासमोर बसून जेवू नका, जेवताना छोट्या छोट्या वाट्या घ्या..

- पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका, लोकांनी सर्व नियम पाळले तर लॉकडाउन परत करण्याचे वेळ येणार नाही ही अपेक्षा ठेवतो.

-  हे संकट शेवटचं असेल असं नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण लढा देतोय.

Published by: sachin Salve
First published: September 13, 2020, 1:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या