मुंबई 03 जानेवारी : महाविकास आघाडीच्या खातेवाटपाचा घोळ गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. काँग्रेसने ताणून धरल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेसला त्यांच्या वाट्याल्या आलेल्या खात्यांमध्ये बदल पाहिजे असून शिवसेना किंवा राष्ट्रावादीकडे असलेल्या खात्यांपैकी दोन महत्त्वाची खाती पाहिजे आहेत. जवळपास सर्व खातेवाटप पूर्ण झालं असा दावा काँग्रेसचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी केला होता. मात्र अद्यापही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटप रखडलेलं असतानाच पालकमंत्रिपदाबाबात मात्र फॉर्म्युला ठरला अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या नावांची थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला 14-12-10 हा असण्याची शक्यता आहे. शिवसेना 14, राष्ट्रवादी 12, काँग्रेसचे 10 अशी वाटणी करण्यात आलीय. आमदारांच्या संख्याबळानुसार पालकमंत्री प्रत्येक पक्षाला मिळणार आहेत. पालकमंत्री पदावरूनही वाद होते मात्र ते मिटविण्यात आले आहेत. स्थानिक प्रश्न सोडविण्यात पालमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्या आपल्याला मिळावा अशी तीनही पक्षांची चढाओढ होती.
असं असेल पालकमंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप
नगर - बाळासाहेब थोरात
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
नांदेड - अशोक चव्हाण
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
जालना - राजेश टोपे
चंद्रपूर - विजय वेदट्टीवर
लातूर - अमित देशमुख
रत्नागिरी -उदय सामंत
धुळे - दादा भुसे
यवतमाळ - संजय राठोड
जळगाव - गुलाबराव पाटील
नंदुरबार - के सी पाडावी
औरंगाबाद - संदीपन भुमरे
सिंधुदुर्ग - अनिल परब
अमरावती - यशोमती ठाकूर
मुंबई शहर - आदित्य ठाकरे
मुंबई उपनागर -अस्लम शेख
बीड - धनंजय मुंडे
सांगली - जयंत पाटील
नागपूर - नितीन राऊत
नासिक - छगन भुजबळ
रायगड - सुभाष देसाई/ अदिती तटकरे
सातारा - बाळासाहेब पाटील
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
पृथ्वीराज चव्हाण ठरले वादाचे कारण?
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, महसूल किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी करण्यात आली होती. नंतर अजित पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख केला. यावरुन अशोक चव्हाण संतापले आणि म्हणाले पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाहीत, मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचे आहे, ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला, असे अशोक चव्हाण अजित पवारांना सुनावले. त्यानंतर अजित पवारांनी परत पृथ्वीराज चव्हाणांचा विषय काढत ते संयमी नेते असल्याचे म्हटले.ा
शिवसेनेत बंडखोरी? देवयानी डोनगावकर यांनी दाखल केला अपक्ष अर्ज
त्यावरुन वाद उफाळला. तसेच पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. सत्तास्थापनेपासूनच्या चर्चेत तेही होते. तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असेही अजित पवार म्हणाले. त्यावरुन चिडलेल्या अशोक चव्हाणांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांनी मात्र वादाचं वृत्त फेटाळून लावलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav tahckeray