Home /News /mumbai /

'...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

'...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

    मुंबई, 22 जून : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) मोठा पेच निर्माण झाला आहे. हा पेच आता सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ख्याती असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडी सरकार असंच अबाधित ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर याबाबत चर्चा झाली. या चर्चेत नेमकं कोणकोणत्या मु्द्द्यांवर चर्चा झाली याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर ही मोठी नामुष्की असेल, असंदेखील या भेटीत चर्चा झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद झाल्यानंतर त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेल्या पेच प्रसंगावर मंथन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजीनामा द्यायची तयारी आहे. ते वर्षा सोडून त्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी जाण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुक लाईव्हमध्येही याबाबत उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला. या चर्चेत नेमकं काय झालं असावं ? शिवसेना अंतर्गत कलहामुळे जर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणं तर ही मोठी नामुष्की आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी काय मार्ग यावर चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय शरद पवार यांच्यावर अनेक राजकीय घराणे फोडल्याचा सातत्याने आरोप होतो. आता तर शिवसेना पक्षच फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जर पक्षफोडीला कारणीभूत, असा ठपका शरद पवार यांना नको असेल तर राष्ट्रवादी पाठिंबा काढण्याची भूमिका घेऊ शकते. कारण सरकार अल्पमतात गेल्यानं पडलं, असा ठपका एकवेळ सुसह्य असेल. त्यांतच काँग्रेस आमदारांमध्येही नाराजी आहे, असा अंदाज बांधला जातोय. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. "माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे. ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. मी आजच वर्षा बंगल्यातून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करत आहे. गायब आमदारांनी समोर येऊन माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे. कोरोना नसता तर मीच राजीनामा घेऊन गेलो असतो. शिवसैनिकांनी सांगावं मी शिवसेना पक्षप्रमुख पदासाठी योग्य नाही, मी शिवसेना प्रमुखपद सोडण्यास तयार आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या