मुंबई 20 फेब्रुवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच भेट आहे. ही शिष्टाचार भेट असल्याचं सांगितलं जातं आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र 25 वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. या भेटीत ते आणखी काही मंडळींचीही भेट घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनीही एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध झुगारत उद्धव ठाकरे यांनी राज्यात CAA आणि NPR लागू करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
ठाकरेंवर काँग्रेस नाराज
'एल्गार' परिषदेचा तपास NIAला देण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राज्यात NPR लागू करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केला. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याला तीव्र आक्षेप घेत ठाकरेंना युतीधर्माची आठवण करून दिली.
इतर बातम्या - दिल्ली निवडणुकांमध्ये का झाला भाजपचा पराभव? RSSने सांगितली 'INSIDE STORY'
खरगे म्हणाले, हे तीन पक्षांचं सरकार आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं. NPR लागू करायला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांची भूमिका लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय चालणार नाही. महत्त्वाचे निर्णय तिनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीतच घेतले जावे असंही त्यांनी म्हटलं.
NPRवर उद्धव ठाकरे यांनी सर्व पैलुंचा विचार करत निर्णय घेतला. त्यावर फेरविचार होणार नाही असं शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगितलं जातं. या आधी 'एल्गार' परिषदेचा तपास NIAला देण्यावरून त्यांच्यात मतभेद झाले होते. राष्ट्रवादीने त्याला विरोध केला होता. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अधिकारात निर्णय घेतला होता.
इतर बातम्या - Maha Shivratri 2020: महाशिवरात्र का साजरी करतात? हे कारण तुम्हाला माहीत आहे का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narendra modi, NCP, Sharad pawar, Shivsena, Uddhav thackeray