राऊत-फडणवीस भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक, नेमकं काय घडलं?

राऊत-फडणवीस भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक, नेमकं काय घडलं?

शिवसेना आमदारांच्या विभागवार बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये भेट झाली आणि राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा शक्यतांचा बाजार उठला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे ऐतिहासिक समीकरण बिघडून पुन्हा सेना-भाजप एकत्र येणार का, अशी चर्चा रंगू लागली. या पार्श्वभूमीवर आज झालेली शिवसेना आमदारांची बैठकही चर्चेत आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून शिवसेनेच्या विभागवार आमदारांच्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यात खरोखरंच पुन्हा नव्याने काही हालचाली सुरू झाल्या आहेत का, या चर्चांना वेग मिळाला. मात्र या बैठकीनंतर शिवसेना आमदारांनी राजकीय भूकंपाच्या चर्चांना खोडून काढलं आहे.

वर्षा बंगल्यावर आज पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेली सहा महिने कोविड-19 चा संसर्ग सुरू असल्यामुळे आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाली नव्हती. आजपासून सुरू झालेल्या शिवसेना आमदारांच्या विभागवार बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहेत.

बैठकीनंतर काय म्हणाले शिवसेना आमदार?

'मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता यासंदर्भात बैठक झाली. सर्व अडचणी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. मतदारसंघातील प्रश्न सोडवून विकासाला गती देण्यासंदर्भातच बैठक झाली. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटीचा विषयच नव्हता,' अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

राऊत-फडणवीस भेटीवरून सुरू असलेली चर्चा आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आमदारांची बैठक या योगायोगानंतरही शिवसेना आमदारांच्या माहितीमुळे वेगळ्या चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे. मात्र आगामी काळात यासंदर्भात पुन्हा नव्याने काही घडामोडी घडतात का, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या