महाविकासआघाडीचा खातेवाटपाचा तिढा सुटला? या तारखेला मंत्र्याचा शपथविधी

महाविकासआघाडीचा खातेवाटपाचा तिढा सुटला? या तारखेला मंत्र्याचा शपथविधी

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत एकमत

  • Share this:

मुंबई,6 डिसेंबर:शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीच्या सरकारमधील खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत एकमत झाले आहेत. येत्या 9 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आहे. त्यानंतर राजभवणावर शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

6 मंत्र्यांसाठी घेतला मोठा निर्णय?

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही मंत्र्यांचा खातेवाटप झालेला नाही. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत 6 मंत्र्यांना तुर्तास खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 9 दिवस झाले मात्र अजुनही खातेवाटप जाहीर केलं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये ही चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार सहभागी झाले तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे सहभागी झाले. यावेळी, खातेवाटपामध्ये फार दिरंगाई नको, खातेवाटप लवकर जाहीर करावे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

तसेच गृहविभाग तुर्तास हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असावे, असा सूरही या बैठकीत पाहण्यास मिळाला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना या अजून काही खात्यावरून स्पष्टता होणे गरजेच आहे. यासाठी पुन्हा तीन पक्षाचे नेते चर्चा करणार असल्याचे समजते.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार!

खातेवाटपाला उशीर होत असल्याने नाराजीही निर्माण झाली होती. काही महत्त्वाच्या खात्यांबाबात निर्णय होत नसल्याने खातेवाटप अडलं अशी माहिती आहे. मात्र, आता लवकरच मार्ग निघेल आणि खातेवाटप जाहीर होईल असंही बोललं जातंय. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इतर 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रिपदांबाबत मोठी स्पर्धा सुरू असल्यानं खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ही कोंडी फुटणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळ अधिवेशनाआधी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही यामध्ये समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या