मुंबई, 11 सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत उपसमितीचे अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने दोन मुद्यांवर चर्चा झाली आहे.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने अंतरीम आदेश रद्द करता येईल का? त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका करण्यात येईल का? दुसरा पर्याय सरकारकडे अध्यादेश काढण्यासंदर्भात आहे. जर तो अध्यादेश काढला तर सरकारला ते आरक्षण नोकरीत आणि शिक्षणात देतां येईल का? या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणाविषयी उद्धव ठाकरे काय म्हणाले?
'मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्षनेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते. पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करत कामा नये,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब, दिलीप वळसे पाटील, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.