08 डिसेंबर : नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय ही घटना दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.
मोदी सरकारच्या कृषीधोरणाचा विरोध करत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिलाय. पटोले आता स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. नाना पटोले यांनी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूवर पटोले यांनी मुख्यमंत्री मुंबईत राहुन उंटावरून शेळ्या हाकतात अशी टीका केली होती.
वेळोवेळी पक्षाला अहेर देणाऱ्या नाना पटोले यांनी अखेर भाजपला रामराम ठोकलाय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पटोले यांनी का राजीनामा दिलाय याची माहिती घेतलेली नाही. पण, त्यांनी राजीनामा दिलाय ही दुर्दैवी गोष्ट आहे. यावर योग्य वेळी भाष्य करीन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
पटोलेंची ही तर जुनी सवय -दानवे
तर पक्ष विरोधी बोलत असतानाच नाना पटोलेंचा अंदाज आला होता. त्यांचा राजीनामा दुर्दैवी आहे, मुळात पक्षावर आरोप करून राजीनामा देणं ही पटोलेंची जुनी सवय आहे. शेतकऱ्यांसंदर्भात आरोप करून राजीनामा देणं चुकीचं आहे. भाजपात खासदारांची कुठल्याही प्रकारची मुस्कटदाबी नाही अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. तसंच प्रफुल्ल पटेल भाजपच्या वाटेवर नाही असंही दानवेंनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.