Home /News /mumbai /

BREAKING : शिवसेनेच्या व्हीपला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले....

BREAKING : शिवसेनेच्या व्हीपला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले....

शिवसेनेच्या व्हीपवर एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

    पणजी, 2 जुलै : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या (Maharashtra Assemble Speak Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) शिवसेनेचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कोण कुणाला मत देणार हे उघडपणे स्पष्ट होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्व आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. या व्हीपमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. हा व्हीप सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी लागू असणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या व्हीपला विरोध केला आहे. शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही. कारण दोन तृतीयांश संख्याबळ आमच्या बाजूने आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याच्या हॉटेलमधून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते गोव्याच्या विमानतळावर दाखल झाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या आमदारांसोबत होते. गोवा विमानतळावर दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपण सर्व आमदारांना घेऊन मुंबईत जात असल्याची माहिती दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या व्हीपबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी शिवसेनेचा व्हीप आपल्याला लागू होऊ शकणार नाही, असं विधान केलं. "व्हीप आमच्यावर लागू होणार नाही. कारण शिवसेनेचं दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हीप आम्हाला लागू होत नाही. आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामारं जाणार आहोत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा व्हिप ऐकला नाही तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कदाचित कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणं शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करतं हे उघडपणे स्पष्ट होणार आहे. (अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध, मनसे-भाजप आमनेसामने येणार?) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. हा व्हीप नियमानुसार सर्वच आमदारांसाठी लागू होणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते सुनील प्रभू यांचा व्हीप मानतात की भाजपच्या उमेदवाराला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून विधीमंडळाचं गटनेतेपद हे अजय चौधरी यांना देण्यात आलं आहे. पण ते शिंदे गट मानण्यास तयार नाही. आपल्याला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपणच शिवसेनेचे गटनेता असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गटनेते पद आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी कोर्टात गेली आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरु आहे. पण उद्या विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेना आणि बंडखोर यांच्यात संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या