महाराष्ट्रात आंदोलनाला हिंसक वळण; परभणीत अग्निशमन दलाची गाडी फोडली

महाराष्ट्रात आंदोलनाला हिंसक वळण; परभणीत अग्निशमन दलाची गाडी फोडली

CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळन लागले.

  • Share this:

मुंबई,20 डिसेंबर: केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरात कडाडून विरोध केला जात आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळन लागले. परभणीत आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली आहे. बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात दगडफेक करण्यात आली तर हिंगोली जिल्ह्यात तीन एसटी बसवर दगडफेक करून जाळपोळीचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यात होणाऱ्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे.

कॅब आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात शुक्रवारी परभणीत मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. शहरातील ईदगाह मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये, हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी केंद्र सरकार, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकार जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला घाबरवण्यासाठी अशा प्रकारचा कायदा आणत असल्याचा आरोप, यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. दुपारी दोन वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये, मुस्लीम समाज सोबत अन्य समाजातील अनेकजण सहभागी झाले होते.

मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे, मुस्लीम समाजाच्या हिरव्या झेंड्यासोबत, भगवा, निळा, पिवळा आणि अन्य रंगाचे झेंडे युवकांच्या हातामध्ये होते. सोबत संविधान बचाव आणि एनआरसी कायद्याला विरोध करणारे फलक यावेळी युवकांनी झळकावले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरा जवळ, असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये, या मोर्चाचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी मोर्चातील मान्यवरांनी उपस्थित मोर्चेकरयांना मार्गदर्शन केले.

सोलापुरात मात्र समर्थनार्थ लॉंग मार्च

कॅब आणि एनआरसीला देशभरातून विरोध होत असतानाच सोलापुरात मात्र त्याच्या समर्थनार्थ लॉंग मार्च काढत निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि देशप्रेमी नागरिकांच्यावतीने ही निदर्शने करण्यात आलीत. सीएए आणि एनआरसी हे कायदे देशहिताचे असून त्यामुळे कोणत्याही समाजात फूट पडण्याचा प्रश्न नाही. केवळ राजकीय उद्देशाने याला विरोध होत आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या कायद्याला विरोध करत समाजात द्वेष पसरवून देशात अस्थिरता पसरवली जात असल्याचा आरोप यावेळी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी नेत्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी आपली मते व्यक्त केले.

बीड शहरात दगडफेक, पोलिसांकडून लाठीचार्ज

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी बिल विरोधात पुकारण्यात आलेल्या बंद हिंसक वळण लागलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बीड शहरातील बशीर गंज, भाजीमंडई, राजुरी वेस, डीसीसी बँकेत परिसरातही दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाली आहे. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

एनआरसी-सीएए कायद्याविरोधात शुक्रवारी बीड बंदची हाक देण्यात आली होती. या संदर्भात दुपार बंदला गालबोट लागले. जमावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक दगडफेक केली. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिस लक्ष ठेऊन आहेत.

हिंगोलीत तीन एसटी बसवर दगडफेक, जाळपोळीचा प्रयत्न

सीएए व एनआरसीचे विरोधात हिंगोलीत बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान कळमनुरी येथे बंदचे आवाहन करण्यात आले होता. या बंद दरम्यान काही काही अज्ञात व्यक्तींनी भाजी मंडीजवळ जुना बस स्टँड परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. तसेच दुसऱ्या बसवर दगडफेक करून जाण्याच्या प्रयत्न केला. हिंगोली शहरात ही हिंगोला आगारातून तूर्तास बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.

दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यांतही सीएए आणि एनआरसी बिल विरोधात बंद पुकारण्यात आला आहे. काही ठिकाणी शुक्रवारी सकाळी बंदला हिंसक वळण लागले. हिंगोली येथे समाजकंटकांकडून बसची तोडफोड व जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दुपारी कळमनुरी येथे प्रदर्शन कर्त्याकडून अचानक रस्ता रोको करण्यात आला. रस्ता रोकोनंतर जमावाने अचानक दगडफेक केली.

समाजकंटकांनी वाहने, पोलिस आणि दुकानांवर प्रचंड दगडफेक केली. या दगडफेकीत काही नागरिक व पोलीस जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहनांवर व दुकानांवर झालेल्या दगडफेकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज केला.

कळमनुरीमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळमनुरी हा संवेदनशील असतानाही पोलिस बंदोबस्त अत्यंत तोकडे असल्यामुळे समाजकंटकांनी हा उपद्रव केल्याचे बोलले जात आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

भिवंडीत मोर्चा..

नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केल्याने यास विरोध करण्यासाठी   भिवंडी शहरात आज मुस्लिम  बांधवांची नमाज पठण  झाल्यावर दिघे चौकात हजारो मुस्लिम बांधव एकत्र जमून प्रांत कार्यालयावर  भव्य मोर्चा  काढण्यात आला यावेळी घोषणा देत हातात बॅनर घेत हजारो संख्येने मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे... 

मोर्चाला इतर मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांनी पाठिंबा..

औरंगाबादेत आज सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चा एमआयएम च्या वतीने काढला जाणार आहे. या मोर्चाला इतर मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आझाद चाऊकातून हमोर्चा विभागीय कार्यालयावर जाणार आहे. मोर्चा मार्गात आणि विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त आहे.

वाशिममध्ये बहुजन क्रांती मोर्चा

केंद्र सरकारने नागरिकत्व बिल संसदेत पास केल्यानंतर देशभरात वेगवेगळ्या संघटनेचा विरोध होत आहे. भारतीय जनता पक्षाने आणलेल्या कॅब आणि भारतीय नागरीकता संशोधन कायदा (एनआरसी) चा विरोध करण्यासाठी तीन टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या चरणबद्ध आंदोलनांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनाला बहुसंख्य मुस्लिम बांधवानी पाठींबा देत यात सहभाग घेतला होता.

कोपरगाव शहरात कडकडीत बंद

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात अहमदनगर जिल्हयात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून निदर्शने करण्यात आली. संगमनेर, कोपरगाव आणि राहाता येथे संविधान बचाव रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरगाव येथे कडकडीत बंद आहे.

ठाण्यातील राबोडी परिसरात निदर्शने

सुधारित नागरिक तत्व कायद्या संदर्भात ठाण्यातील राबोडी परिसरात देखील निदर्शने करण्यात आली. ठाण्याच्या राबोडी येथील जामा मशीद या ठिकाणी मुस्लीम बांधवांकडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत सुधारित नागरिक तत्व कायद्या संदर्भात निदर्शने करण्यात आली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसच कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता मोठा पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा गीत गाऊन हा निषेध करण्यात आला.कौतुकाची बाब म्हणजे सुधारित नागरिकतत्व कायद्या संदर्भात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली मात्र जवळपास सर्वच निदर्शनांना हिंसक वळण लागलं. ज्यामुळे देशाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. ठाण्यात मात्र ही दुसरीवेळ निदर्शने केली गेली ज्यात मोठ्या संख्येने आंदोलक शामिल झाले मात्र कुठेही कायदा न मोडता कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता आंदोलकांनी आपली निदर्शने केली.

Published by: Sandip Parolekar
First published: December 20, 2019, 4:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading