Elec-widget

बुलेट ट्रेनच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्पष्ट खुलासा

बुलेट ट्रेनच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्पष्ट खुलासा

"कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. विकासकामांना आणखी गती कशी मिळेल, याबद्दल आमचे प्रयत्न सुरू आहे"

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील विकासकामांबद्दल आढावा घेतला. यावेळी, बुलेट ट्रेनबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आज राज्य मंत्रिमंडळाची विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  'रोज आमच्या आढावा बैठक सुरू आहे. कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. विकास कामांना आणखी गती कशी मिळेल, याबद्दल आमचे प्रयत्न सुरू आहे. बुलेट ट्रेनबद्दल अजून कोणताही निर्णय घेतला नाही. स्थगिती देण्याचा निर्णय घेतला नाही. विकास कामांना कुठेही स्थगिती दिली नाही. राज्यभरात कुठे विकासकामं सुरू आहे. याबद्दल आढावा घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाईल', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बुलेट ट्रेनसारखा पांढरा हत्ती का पोसायचा असं वक्तव्य केलं होतं. याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले असता, यावरच विचार करू, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

भीमा कोरेगाव प्रकरणी आधीच्या सरकारने आदेश दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली की नाही. हे पाहावं लागणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading...

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र, उपलब्ध निधी आणि त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची  प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com