मुख्यमंत्र्यांकडून PM मोदींना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न, मात्र...

मुख्यमंत्र्यांकडून PM मोदींना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न, मात्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणूक (West bengal election 2021) प्रचारात असल्याने मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याशी संवाद झाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : देशभरातील कोरोना रुग्णांची वाढती स्थिती शासन-प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून यंत्रणा हतबल झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑक्सिजन पुरवठा आणि इतर मुद्द्यांवर मदत मागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मुख्यमंत्र्यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणूक (West bengal election 2021) प्रचारात असल्याने त्यांच्याशी संवाद झाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शिवसेनेनं नुकतीच केली होती खरमरीत टीका

'प. बंगालातील निवडणुकांचे मेळे पंतप्रधान थांबवायला तयार नाहीत, तेथे कुंभमेळय़ातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा? कोरोनाची आपत्ती केंद्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही,' असं म्हणत शिवसेनेनं नुकतीच आपली नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा - मुंबई संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने! कोरोना स्थिती पाहाता महापौरांनी दिले संकेत

'राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. पण सरकारने मधल्या काळात राजधानी प. बंगालात हलवली व दिल्लीचा ताबाही कोरोनाने घेतला. एकदा राजधानीच पडल्यावर देश पडायला किती वेळ लागतोय? कोरोनाच्या संकटाने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. दिल्लीसह देश तडफडताना दिसत आहे. चित्र भयंकर होतेच, ते अधिक धोकादायक होताना दिसत आहे,' असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारचा समाचार घेण्यात आला होता.

Published by: Akshay Shitole
First published: April 17, 2021, 1:41 PM IST

ताज्या बातम्या