Home /News /mumbai /

एकेकाळी शिवसेनेला भगदाड पाडणाऱ्या दिग्गज नेत्याने केलं एकनाथ खडसेंचं राष्ट्रवादीत स्वागत

एकेकाळी शिवसेनेला भगदाड पाडणाऱ्या दिग्गज नेत्याने केलं एकनाथ खडसेंचं राष्ट्रवादीत स्वागत

महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी मतभेदांमुळे पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

  मुंबई, 21 ऑक्टोबर : राजकीय नेत्यांचं पक्षांतर महाराष्ट्राला वा देशाला नवीन नाही. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी मतभेदांमुळे पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. सध्या राज्यात एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. अशावेळी त्यांना नव्या राजकीय वाटचालीसाठी एकेकाळी शिवसेनेला हादरा देत अनेक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. छगन भुजबळ यांनी शिवसेनेतील अंतर्गत संघर्षानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसंच राज्याच्या राजकारणात नवा पक्ष उदयाला आल्यानंतर भुजबळ यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला. याच भुजबळ यांनी आता भाजपला धक्का देणाऱ्या एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादीत स्वागत केलं आहे. 'एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत. त्यांनी भाजप या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते. असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल,' असा विश्वास देखील भुजबळ यांनी व्यक्त केला. 'एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो,' असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल. त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Chagan bhujbal, Eknath khadse

  पुढील बातम्या