मुंबई, 24 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीचा तिढा (Rajya Sabha Election 2022) अद्याप सुटलेला नाही. कारण शिवसेनेकडून (Shiv Sena) कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी ती अधिकृत घोषणा नाही. शिनसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्याबाबतची घोषणा केली होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून खासदार संभाजीराजेंना (Sambhaji Raje) उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरुवातीला होती. पण शिवसेनेने पाठवलेला प्रस्ताव संभाजीराजेंनी नाकारला. त्यामुळे शिवसेनेच्या कोल्हापुरच्या जिल्हाध्यांना उमेदवारी देण्यात आली, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. पण शिवसेनेच्या या निर्णयामुळे राज्यातील काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. छावा (Chhava) संघटनेचे पदाधिकारी तर आज मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. त्यांनी मुंबईतील ट्रायडेंट (Trident) हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला. तसेच राज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी कसं वागावं याचाही ड्राफ्ट शिवसेनेने ठरवला होता, असा धक्कादायक दावा छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी केला.
"संभाजीराजे यांनी कसं वागावं? अशा अनेक अटी ड्राफ्टमध्ये घातल्या होत्या. 2 दिवस वाट पाहणार. नंतर धक्कादायक पुरावे बाहेर काढणार. राजे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. स्वराज्य हे 18 पागड जातींसाठी आहे. राज्यसभा मिळवायची की राज्य मिळवायचं ही संभाजीराजे यांची भविष्यातील भूमिका आहे. राज्यातील अनेक संघटना उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. महत्वाचे निर्णय उद्या बैठकीत घेणार", असा इशारा धनंजय जाधव यांनी दिला.
छावा संघटनेकडून घडामोडींची सविस्तर माहिती
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी भूमिका मांडली. "मला तुमच्यासमोर काही गोष्टी आणल्या पाहिजेत. संभाजीराजेंनी दिल्ली, मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची भेटीगाठी घेतल्या. सर्वपक्षीय नेतेमंडळींना आपण ही जागा कशा पद्धतीने लढतोय हे सांगीतलं होतं. त्यामध्ये तुमचं सहकार्य हवं असल्याचं आवाहन सभाजीराजेंनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा वेगळ्या पद्धतीचा बॉल आमच्यावर टाकला होता. त्यांनी नांदेड येथील सभेत जाहीर केलं होतं की, संभाजीराजे छत्रपती यांना आमच्या पक्षाची सर्व मते देऊ. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडल्यानंतर तो चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला", अशी माहिती धनंजय जाधव यांनी दिली.
(महाविकास आघाडीची 'वर्षा'वर बैठक, 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ, मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग)
"शिवसेनेच्या कोर्टात गेल्यानंतर तो चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल देसाई, अनिल परब, उदय सामंत आणि शिवसेनेचे वाचाळवीर संजय राऊत या सर्वांना सांगितलं होतं. याबाबतीत इतकी पुढे चर्चा गेली होती. मीडियाच्या माध्यमातूनही आपण पाहिलं असेल. एकप्रकारचा ट्रॅप ठरला होता. तो ट्रॅप म्हणजे संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी प्रोब्लेम आहेत. तर त्यांना त्यापद्धतीने पुरस्कृत कसं करता येईल, याबाबतचा ट्रॅप एका मंत्र्याच्या बंगल्यात तयार झाला होता. त्या मंत्र्याने कोणते आढेवेढे घेतले होते, त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संमती होती. संमती असताना तो सगला ड्राफ्ट फायनल झाल्यानंतर याच ट्रायडेंट हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर या सगळ्या व्यक्तींनी छत्रपती संभाजीराजेंना पूरस्कृत करण्याबाबत एकवाक्यता झालं. मीडियामध्येही शिवसेना पूरस्कृत संभाजीराजे यांचं नाव महाविकास आघाडीच्यावतीने पुढे आलं आहे, अशा बातम्या पेरल्या गेल्या", असं धनंजय जाधव म्हणाले.
'शरद पवारांना विश्वासघातकाचा डाग पुसण्याची संधी'
"अजूनही वेळ गेलेली नाही. आजवर आपल्यावर लागलेला विश्वासघातकाचा डाग पुसण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना दिलेला शब्द फिरवता कामा नये. शिवाजी महाराजांच्या नावातील शिव घेऊन तुम्ही ही संघटना चालवत असाल तर मी ज्या नेत्यांची नावे घेतली त्यांनी स्वत:च्या मनाला शिवाजी महाराजांची साक्ष घेऊन सांगावं की, संभाजी महाराजांसोबत ओपन टेबल मिटींग करा. तुम्ही दिलेले आश्वासन खोटे असतील तर आम्ही आहे त्याठिकाणी थांबू. पण तुम्ही जी गद्दारी केली आहे, तु्म्ही जे वागले आहात ते पुराव्यानिशी फोटोग्राफ घेऊन येत्या काही दिवसांत संभाजीराजेंच्या परवानगीने तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आणून येणाऱ्या निवडणुकीत यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत. पण अजूनही संधी गेलेली नाही. आपण संभाजीराजेंना संधी द्यावी, हीच विनंती", असं आवाहन त्यांनी केलं.
'निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ'
"दोघांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. मी माझ्या स्वत:च्या कानांनी ऐकल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व गोष्टी मान्य होत्या. उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना पूरस्कृत करणे आणि याबाबतचा ड्राफ्ट तयार करण्याच्या निर्णयाला संमती दिलेली होती. यामध्ये आलेल्या शिष्टमंडळात मीदेखील सहभागी होतो. त्यांनी संभाजीराजेंना दिलेल्या अटी मान्य आहेत, असं सांगितलं होतं. या सर्व प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे तर संजय राऊतांनी हे पाप घेतलेलं आहे. येत्या काळात संजय राऊत हेच महाविकास आघाडीचा नाश केल्याशिवाय राहणार नाहीत. आमची पूर्ण तयारी आहे. आमची मतांची गोळाबेरीज झालेली आहे. या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. आमचा विजय निश्चित होईल", असं जाधव म्हणाले.
'छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राला धोका'
"छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राला धोका देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्यांना राज्यसभेत पाठवतात. धोका या शब्दाचं नाव शरद पवार ठेवावं", असा घणाघात छावा संघटनेचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी केला.
'शिवसेना गद्दार पक्ष'
"शिवसेना गद्दार पक्ष आहे. शिवसेनेनं शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली. याचे त्याचे पाय चाटून सेनेनं सत्ता मिळवली. भाजपनं पाठिंबा द्यावा", अशी मागणी छावाचे विनोद साबळे यांनी केली.
'दोन दिवस वाट पाहणार, नंतर रस्त्यावर उतरणार'
"सगळ्या पक्षांनी मन मोठं केलं असतं तर शिवाजींच्या ऋणातून मुक्त होण्याची वेळ आली असती. अजून 2 दिवस वाट पहाणार. यानंतर रस्त्यावर उतरणार. संजय राऊत अत्यंत खालच्या थराचे नेते आहेत", अशी टीका छावा संघटनेचे नेते गंगाधर काळकुटे यांनी केली.
'मातोश्री सोडून महाराष्ट्रात फिरून दाखवा'
"मी अपक्ष लढणार ही संभाजीराजे यांनी भूमिका आधीच जाहीर केली होती. 'मातोश्री' सोडून महाराष्ट्रात फिरून दाखवा. मराठा समाज जागा दाखवून देईल. संभाजीराजे संयमित नेते आहेत. संजय राऊत यांची छत्रपतींवर बोलायची लायकी नाही", अशी खोचक टीका छावा संघटनेचे नेते महेश डोंगरे पाटील यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.