छात्रभारतीची निदर्शने, शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दाखवले काळे झेंडे

छात्रभारतीची निदर्शने, शिक्षणमंत्री विनोद तावडेंना दाखवले काळे झेंडे

आधी SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन करा मगच इतरांची अ‍ॅडमिशन करा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

  • Share this:

मुंबई 14 जून : शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज काळे झेंडे दाखवले. मुंबईतल्या प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरा १०वी, १२वी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. त्यावेळी SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. विनोद तावडे  यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली आणि सरकार करत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली.

तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना तुकड्या वाढवत आहोत आणि लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुरू असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर आक्षेप घेत छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले यांनी, तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाही. सर्व अनुदानित तुकड्या आणि कॉलेजेस आधी एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावेत. आधी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन करा मगच इतरांची अ‍ॅडमिशन करा अशी मागणी केली. विनाअनुदानित तुकडीतील अकरावी प्रवेश गरीब मुलांना महाग पडेल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे अंतर्गत २० गुण रद्द करत १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयामुळे एसएससी बोर्डाची जवळपास ४ लाख मुलं नापास झाली आहेत. याउलट CBSE आणि ICSE बोर्डांनी तोंडी परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत, त्यांचा निकालही चांगला लागला आहे. या सगळ्याचा फटका अकरावी प्रवेशावेळी एसएससी बोर्डांच्या मुलांना बसणार आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, विनाअनुदानित तुकड्यांमध्ये जादा फी देऊन प्रवेश घ्यावा लागेल अशा अनेक अडचणींचा सामना एसएससी बोर्डांच्या मुलांना करावा लागणार आहे. यामुळे SSC बोर्डांच्या विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या