'राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता', चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; राऊत-फडणवीस भेटीबाबतही भाष्य

'राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता', चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; राऊत-फडणवीस भेटीबाबतही भाष्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : 'राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको आहे. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही,' असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

'भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी अशीही परिस्थिती नाही. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार,' अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी मध्यावधी निवडणूक होण्याची भविष्यवाणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

राऊत-फडणवीस भेटीबाबतही नवा दावा

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. मात्र ही भेट राजकीय नसून मुलाखतीबाबत होती, असा खुलासा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. 'देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट राजकीयच होती,' असं चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे.

'राऊत-फडणवीस भेट जरी राजकीय असली तरीही या भेटीतून फारसं काही निष्पन्न झालं नाही,' असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र एकीकडे ही भेट केवळ मुलाखतीसाठी असा दावा संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2020, 9:21 PM IST

ताज्या बातम्या