नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे - राणे

नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे - राणे

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

  • Share this:

09 एप्रिल : 'मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच,तेव्हा बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही.मी कोणत्याही पक्षात असलो-गेलो तरी बाळासाहेबांचं स्थान अढळ.' हे उद्गार आहेत नारायण राणे यांचे. आपल्या पासष्टीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना राणे म्हणाले, 'माझ्या मनात मुंबईचा महापौर होण्याचं होतं तेव्हा बाळासाहेबांनी मला आमदारकीचं तिकीट दिलं.नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे.नाहीतर हा नोकरदार कोकणी माणूस महाराष्ट्राला कधी दिसला नसताच.' पुढे ते असंही म्हणाले की, 'मी जे ठरवतो तेच करतो आणि कुणालाच घाबरत नाही.कारण प्रामाणिकपणे काम केलं तर घाबरायचं कारण नाही.बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याशी जसा बोलायचो, आज सोनिया गांधी, राहुल गांधीशी असंच बोलतो.'

राणेंच्या पासष्ठीचा कार्यक्रमाला काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी यांसारख्या पक्षातील वजनदार आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, रामराजे निंबाळकर, भाजप नेते नितीन गडकरी, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित होते.यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले,'मी राणेंना काँग्रेसमध्ये जाताना म्हटलं होतं की राणे तुम्ही आगीतून सुटून फुफाट्यात जाताय.हे खरं आहे, कारण सुशीलकुमार शिंदेंना ठावूक आहे की हायकमांड हसली की आपल्यालाही हसावं लागतं.हा स्वभाव राणेंचा नाही, त्यांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे, कर्तृत्व, क्षमता आहे.'

राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं गेलं असतं, असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

नितीन गडकरींनी यावेळी राणेंचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, 'राणेसाहेब आणि मी दोघे मिळून विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावायचो.कोणतीही पार्श्वभूमी नसताना राणेंनी मुंबईत येऊन धडाडीनं नेतृत्व उभं केलं.राजकारणात राणेंचं व्यक्तिमत्त्व हे सेल्फ मेड आहे. पक्ष बदलल्यानंतर माणसं रंग बदलतात.मात्र, शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेबांचा अनादर केला नाही.तिकडून कितीही टीका झाली तरी त्यांनी कधीही अनादर होईल असं वक्तव्य केलं नाही.शिवसेना सोडल्यानंतर हे सिध्द झालं की राणेंचं नेतृत्व पक्षापलिकडलं आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 04:48 PM IST

ताज्या बातम्या