मुंबई, 09 जानेवारी : पेट्रोल पंपावर तुम्ही जर क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करत असाल तर आताच सावध व्हा. कारण, पेट्रोल पंपावर कार्डने पेमेंट करत असताना तुमच्या कार्डची माहिती चोरून फसवणूक करणारी टोळी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोल पंपावर क्रेडिट किंवा डेबिट कार्डने बिल भरणाऱ्यांच्या कार्डमधील डेटा स्किमरच्या माध्यमातून चोरी करुन नंतर संबंधित खात्यातून पैसे काढून घेत होते. मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका तक्रारदारासोबत असा प्रसंग घडला. त्यांच्या खात्यातून रक्कम काढून शून्य करण्यात आली. सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे गेल्यावर त्यांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा असे प्रकार 16 ते 17 जणांसोबत घडले असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पेट्रोल पंपावरच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत रितेश अग्रवाल, हैदर शेख, राजेश गौडा आणि उमेश लोकारे या तरुणांना अटक केली.
अशी करत होते कार्डची डेटा चोरी!
या संपूर्ण प्रकरणाचा रितेश अग्रवाल हा मास्टरमाईंड होता. आरोपी राजेश गौडा हा एका पेट्रोल पंपावर काम करत होता. रितेश अग्रवाल याने राजेशला कमिशन देण्याचं आमिष दाखवून कुणी जर पेट्रोल पंपावर कार्डने पेमेंट करत असेल तेव्हा डेटा चोरी करुन घेण्यासाठी तयार केलं. यासाठी रितेशनं राजेशला एक स्किमर मशीन दिली. पेट्रोल पंपावर जेव्हा कुणी डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करायचा तेव्हा गौडा हा कार्डवर असलेला चार डिजीटल कोड बघून घेत होता आणि नंतर लपून स्किमर मशीनच्या माध्यमातून कार्डचा सर्व डेटा ट्रांसफर करून घेत होता. नंतर रितेश अग्रवाल हा स्किमर केलेल्या कार्डच्या माध्यमातून आपला लॅपटॉप वापरून संबंधित खात्यातली सर्व रक्कम काढून घेत होता.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने आणखी किती जणांना फसवलं याचा तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.