आंघोळीला जाताय तर सावधान! गिझरने घेतला 10 वीत शिकणाऱ्या मुलीचा जीव

आंघोळीला जाताय तर सावधान! गिझरने घेतला 10 वीत शिकणाऱ्या मुलीचा जीव

बाथरूममध्ये खेळती हवा राहणं आवश्यक असतं. पाणी गरम झाल्यानंतर गिझर बंद केल्यास संभावित धोका टाळता येऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी :  बोरिवलीत दहावीत शिकणाऱ्या मुलीचा बाथरुममध्ये गॅस गिझरमुळं गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस जळताना कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन होतं आणि तेच तिच्या जीवावर बेतलं.

ध्रुवी गोहिल असं या मुलीचं नाव आहे. ध्रुवीच्या  मृत्यूनं बोरिवलीत राहणाऱ्या  गोहिल कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसलाय.  दहावीत  शिकणारी त्यांची  ध्रुवी आता या जगात राहिली नाही. बाथरुमधील गॅस गिझरमुळं गुदमरुन तिचा मृत्यू झालाय. रविवारी सकाळी पावणे सात वाजता ती आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. मात्र, गुदमरल्यामुळं ती बेशुद्ध पडली.

बराचवेळ झाला तरी ध्रुवी बाथरुम बाहेर न आल्यामुळं कुटुंबियांना  शंका आली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. जवळपास  एक तासभर मुलगी आत होती. मदत करु शकलो नाही, त्यामुळे तिच्या आईने टाहो फोडला.

गिझरमध्ये गॅसचं ज्वलन होत असताना आजूबाजूच्या परिसरातील ऑक्सिजन शोषून घेतला जातो. तसंच कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन होतं. बाथरूम बंद असल्यास कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढतं आणि आंघोळीसाठी गेलेली व्यक्ती बेशुद्ध होण्याची शक्यता असते.

ध्रुवीच्या बाबतीत हेच घडलं असावं असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. गॅस गिझर वापरणाऱ्यांनी काही गोष्टींच्या काळजी घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बाथरूममध्ये खेळती हवा राहणं आवश्यक असतं. पाणी गरम झाल्यानंतर गिझर बंद केल्यास संभावित धोका टाळता येऊ शकतो.

गोहिल कुटुंबीयांनी ही  काळजी घेतली असती तर ध्रुवीचा नाहक बळी गेला नसता.

Published by: sachin Salve
First published: January 14, 2020, 7:34 AM IST

ताज्या बातम्या