आता रडायचं नाही लढायचं, कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीने रुग्णालयातून दिला SSC बोर्डाचा पेपर

आता रडायचं नाही लढायचं, कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीने रुग्णालयातून दिला SSC बोर्डाचा पेपर

कॅन्सरला न घाबरता या विद्यार्थिनीने दहावीचा पेपर दिला, तिच्या या चिकाटीला सलाम!

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : अजिबात हरणार नाही, असं म्हणत मुंबईतील वांद्रे येथील एका शाळेतील एक विद्यार्थिनीने कॅन्सरसारख्या भयंकर आजाराला न घाबरता तोंड दिलं आहे. शनिवारी या विद्यार्थिनीने रुग्णालयातील खाटेवर बसून SSC बोर्डाची परीक्षा देत एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे.

या विद्यार्थिनीवर कॅन्सरचे उपचार सुरू होते. त्यादरम्यान तिला परेल येथील टाटा मेमोरिअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच शनिवारी तिचा दहावी बोर्डाचा पेपर होता. मात्र या परिस्थितीत ती डगमगली नाही तर तिने रुग्णालयात बसून पेपर लिहिला.

हे वाचा - भारतातील सर्वात मोठी बातमी, कोरोनाग्रस्त विमानात शिरल्याने 270 प्रवासी धोक्यात

यासंदर्भात विद्यार्थिनीने स्टेट बोर्डाच्या मुंबई विभागाकडे पेपर सोडविण्यासाठी अधिक वेळ मागितला होता आणि परीक्षेचे सेंटर घराजवळ देण्याची विनंती केली होती. परीक्षेतील पहिले चार पेपर तिने माहिम येथील कॅनोसा हाय स्कूलमधून दिले होते. मात्र तिची प्रकृती खराब झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ती परीक्षा देत असलेल्या सेंटरने शनिवारी सकाळी बोर्डाकडे तिला रुग्णालयातून पेपर लिहिण्याची परवानगी देण्याची विनंती केली.

विद्यार्थिनी रुग्णालयात असली तरी परीक्षा देण्याची तिची इच्छा होती. याबाबत बोर्ड अधिकाऱ्यांनीही तिला रुग्णालयातून पेपर सोडविण्यास परवानगी दिली. आम्हाला यासंदर्भात सकाळी 10 वाजता विचारणा करण्यात आली. विद्यार्थिनीचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आम्ही तातडीने निर्णय घेतला, असे राज्य बोर्डाच्या मुंबई विभागीय सचिव संदीप सांगवे यांनी सांगितले.

आम्ही एक महिला पर्यवेक्षक, पोलीस अधिकारी, महिला रायटर आणि प्रश्नपत्रिका रुग्णालयात पाठवली. यामध्ये सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. विद्यार्थिनीला पेपर देता आला याचा आम्हाला आनंद आहे. यापुढील परीक्षांसाठीही आम्ही विद्यार्थिनीला मदत करू असं, सांगवे यांनी सांगितले.

हे वाचा - खूशखबर! मुंबई-गोवा केवळ 5 तासांत, सरकारची नवी योजना

First published: March 15, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या