अनिल देसाईंना मंत्रीपद कशाला ?, शिवसेनेतूनच विरोध

अनिल देसाईंना मंत्रीपद कशाला ?, शिवसेनेतूनच विरोध

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता आहे. नुसत्या शक्यतेनंतरच शिवसेनेत मंत्रिपदावरुन धुसफूस सुरू झालीये.

  • Share this:

महेंद्र मोरे, मुंबई

01 सप्टेंबर : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. या विस्तारात शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सेनेतून अनिल देसाई यांचं नाव पुढे करण्यात आलंय असं कळतंय. पण दुसरीकडे सेनेतूनच त्यांच्या नावाला विरोध होऊ लागला आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता आहे. नुसत्या शक्यतेनंतरच शिवसेनेत मंत्रिपदावरुन धुसफूस सुरू झालीये. सेनेच्या वाट्याला येणारे संभाव्य मंत्रीपद राज्यसभेतील अनिल देसाई यांना न देता एखाद्या लोकसभा खासदाराला मिळावे अशी मागणी शिवसेनेत जोर धरू लागलीये.

शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार आहेत. आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारखे अनेक टर्म जुने खासदार असताना केवळ उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून अनिल देसाई यांना मंत्रीपद मिळू नये अशी शिवसेना खासदारांची मागणी आहे.

नोव्हेंबर 2014 ला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देसाई यांचे मंत्रीपद निश्चित होते पण महाराष्ट्रात शिवसेनेने विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्विकारायचे ठरवून ऐन शपथविधीच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांची मंत्रीपदाची संधी घालवली.

शिवसेनेत थेट लोकांमधून निवडून आलेले विरूद्ध निवडून न आलेले असा हा वाद पुन्हा एकदा समोर येतोय. विधान परिषदेत आमदार असलेले सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि दीपक सावंत हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. या चौघांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या विधानसभा आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. आता अनिल देसाईंना मंत्रीपद दिलं तर उद्धव ठाकरे यांना लोकसभा खासदारांची नाराजी ओढवून घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 08:18 PM IST

ताज्या बातम्या