मुंबई, 13 जून : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. बोगड्याजवळ लक्झरी बस पलटी झाली आहे. या अपघातामध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 40 प्रवासी यात गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी शर्मा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस माडप बोगद्याजवळ उलटली आहे.
पावसामुळे आधीच रस्ते ओले झाले आहेत. त्यामुळे वाहनं हळू चालवण्याच्या सुचना वारंवार देण्यात येतात पण तरीदेखील वेगाचं भान राखलं जात नाही. वेगात असल्यामुळे बस उलटली असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या अपघातामध्ये 40 प्रवासी जखमी झाले आहेत. तर यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पक्ष घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
बोगद्याच्या मधेच बस उलटली असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर क्रेनच्या मदतीने बस बाजूला घेण्याचं काम सुरू आहे. या अपघाताची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'