मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मायानगरीत तुमचं स्वप्नातलं घर बांधणं झालंय आणखी कठीण; मुंबई ठरली सर्वात महागडी!

मायानगरीत तुमचं स्वप्नातलं घर बांधणं झालंय आणखी कठीण; मुंबई ठरली सर्वात महागडी!

जेएलएल इंडियाच्या (JLL India)  अहवालानुसार मायानगरी मुंबईतील बांधकाम खर्च दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, पुणे आणि हैदराबादपेक्षा 10% जास्त आहे.

जेएलएल इंडियाच्या (JLL India) अहवालानुसार मायानगरी मुंबईतील बांधकाम खर्च दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, पुणे आणि हैदराबादपेक्षा 10% जास्त आहे.

जेएलएल इंडियाच्या (JLL India) अहवालानुसार मायानगरी मुंबईतील बांधकाम खर्च दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, पुणे आणि हैदराबादपेक्षा 10% जास्त आहे.

मुंबई, 12 मार्च : आपल्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात साकारावं, ही अगदी प्रत्येकाची इच्छा असते. ते स्वप्न साकारण्यासाठी कित्येक लोक आपली आयुष्यभराची कमाई खर्च करतात. काही जण बँका किंवा अन्य वित्तसंस्थांकडून कर्ज घेतात. तरीही अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. याचं कारण अर्थातच महागाईत आहे. जमिनीची किंमत (Land Value) आणि बांधकामासाठी येणारा खर्च (Construction Cost) यात वारंवार वाढ होत आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढतच चालल्या आहेत.

अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, देशातल्या सहा मोठ्या महानगरांचा (Metrocities) विचार केला, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) घर बांधण्यासाठी सर्वांत जास्त खर्च येतो. जेएलएल इंडिया (JLL India) या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद या महानगरांच्या तुलनेत मुंबईत बांधकामाचा खर्च 10 टक्के अधिक आहे. तसंच हैदराबाद आणि चेन्नईमध्ये बांधकामाचा खर्च मुंबईच्या तुलनेत 14 टक्के स्वस्त आहे, असंही त्या अहवालात म्हटलं आहे.

मुंबईत घर बांधण्यासाठी येतो इतका खर्च

मुंबई हे अनेकांची स्वप्नं पूर्ण करणारं शहर म्हणून ओळखलं जातं; पण या शहरात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करणं मात्र प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. लाखो लोक या स्वप्नपूर्तीसाठी जिवाचं रान करत असतात. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या गगनचुंबी इमारतीत लक्झरी रेसिडेन्शियल अपार्टमेंटचा (Luxury Residential Apartment) सरासरी बांधकाम खर्च 5625 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा असतो. तेवढ्याच आणि तशाच बांधकामाचा दिल्लीत येणारा खर्च 4950 रुपये, तर पुण्यात 4905 रुपये असतो.

सिमेंट, स्टील आणि बांधकामासाठी लागणारे दगड यांच्या किमती मुंबईत महाग असतात. हे मुंबईत बांधकाम खर्च अधिक असण्याचं महत्त्वाचं कारण आहे.

हैदराबादमध्ये उंच इमारतीच्या बांधकामाचा सरासरी खर्च 4275 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा येतो.

कमी उंचीच्या लक्झरी अपार्टमेंटसाठी मुंबईत येणारा बांधकाम खर्च 3875 रुपये प्रति स्क्वेअर फूट असून, दिल्लीत तो 3410 रुपये आहे.

मुंबईत मध्यम उंचीच्या व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी 3250 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा खर्च येतो. तेवढ्याच आणि तशाच इमारतीच्या बांधकामासाठी दिल्लीत 2860 रुपये, तर हैदराबादमध्ये 2470 रुपये खर्च येतो. पुण्यात येणारा खर्च सर्वसाधारणपणे दिल्लीएवढाच आहे.

तसंच, जास्त उंचीच्या व्यावसायिक इमारतीच्या (High rise Commercial Building) बांधकामासाठी मुंबईत प्रति स्क्वेअर फूट 3875 रुपये, दिल्लीत 3410 रुपये, पुण्यात 3379 रुपये, तर हैदराबादमध्ये 2945 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा खर्च येतो.

हे वाचा -  'मास्क पहनने का यार अपने..' BMC च्या कर्मचाऱ्याने तयार केलं खास गाणं!

कोरोनामुळे किमती वाढल्या

कोरोनाचा (Corona) फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन (Lockdown) लागू केला होता. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू स्थानिक बाजारांमधूनच घेण्यास लोक प्राधान्य देऊ लागले. आजही तोच प्राधान्यक्रम दिसतो आहे. त्यामुळे साहजिक सर्व प्रकारच्या मालाच्या किमती वाढल्या. बांधकाम साहित्याच्याही किमतींमध्ये वाढ झाली. कोरोना काळात या साहित्याच्या किमती पाच ते सहा टक्क्यांनी वाढल्या. ग्रीन फिल्ड आणि इंटीरियर फिटआउट प्रोजेक्टमध्ये किमती वाढण्याचं प्रमाण जास्त होतं. बांधकामाचं साहित्य जेव्हा उपलब्ध झालं, तेव्हा व्हेंडर्सनी तिथून जास्त किमतीत त्याची खरेदी केली. त्यातून पुढे त्यात वाढ होत गेली. त्याशिवाय कोरोनामुळे क्वारंटाइन सुविधा, सॅनिटेशन, थर्मल स्कॅनिंगसह अनेक गोष्टींची सुविधा करावी लागली. त्याचाही परिणाम किंमत वाढण्यात झाला आहे.

कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्रात (Real Estate Sector) कुशल कामगारांची (Skilled Labour) कमतरताही भेडसावते आहे, असं अहवालात म्हटलं आहे. त्याशिवाय आयात केल्या जाणाऱ्या मालाच्या अनुपलब्धतेमुळेही किंमत वाढली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणि मालवाहतुकीच्या दरात झालेल्या वाढीमुळेही बांधकामाच्या खर्चात वाढ झाली आहे.

First published:

Tags: Mumbai