मुंबई, 01 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (maharashtra budget session 2021) पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. मराठवाडा, विदर्भ वैधानिक विकास मंडळ आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला.
अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार यांनी 2020-21 च्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. यावेळी विरोधी बाकांवर उभं राहून घोषणाबाजी केली. तसंच 'दादागिरी नही चलेंगी'च्या घोषणा घेत भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'समतोल विकासाचा विचार करुन या सरकारने निधीचं वाटप केलं आहे का? मला या सभागृहाच्या नियमांनुसार बोलण्याचा अधिकार आहे. मराठवाडा, विदर्भ या राज्याचा भाग आहे. डावपेचात वैधानिक विकास मंडळं अडकता कामा नये. तुम्ही सभागृहातले शरद पवारांचं भाषण जाहीर वाचून पाहा. अजित पवारांनी 15 डिसेंबर 2020 ला आश्वासन दिलं होतं की, मी वैधानिक विकास मंडळं स्थापन करुन देऊ, त्याला 72 दिवस झाले आहेत, ते करणार आहात की नाही ते सांगा, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.
त्यानंतर अजित पवार यांनी उत्तर दिले. 'आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या मताचं आहे. 8 तारखेला बजेटमध्ये विकास मंडळांबद्दल जे ठरलं आहे त्याचे आकडे पाहायला मिळतील. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. 12 विधान परिषदेची नावं दिली आहेत. ज्या दिवशी ती नावं जाहीर केली जातील त्याचवेळी विकास मंडळं घोषित केली जातील' असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले, 'अजितदादांच्या मनात होतं तेच ओठी आलंय. आमदारांच्या नावाखाली विकास मंडळं ओलीस ठेवली जात आहे. राज्यपाल कोणत्या पक्षाचे नाहीत, राज्याचे आहेत. अशी भाषा वापरु नका ती जनता तुम्हाला माफ करणार नाही. आमचं हक्काचं आहे ते आम्ही मागतोय, काही भिक मागत नाही. जो काही संविधानाने अधिकार दिला आहे तो आम्ही मिळवणारच, मी अजितदादांच्या या वक्तव्याचा निषेध करतो' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.
अखेर, अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जाईल तेव्हा विकास मंडळांची घोषणा केली जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.