Mumbai: कोरोना लशीसाठी यापेक्षा अधिक पैसे मागितल्यास कुठे करायची तक्रार, BMC ने दिली माहिती

Mumbai: कोरोना लशीसाठी यापेक्षा अधिक पैसे मागितल्यास कुठे करायची तक्रार, BMC ने दिली माहिती

खासगी लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाची लस द्यायला परवानगी आहे. पण प्रत्येक लशीचे दर ठरलेले आहेत. पाहा कुठल्या Vaccine चा किती द्यायचा दर?

  • Share this:

मुंबई, 11 जून: कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Covid-19 Vaccination ) राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, 18 वर्षांच्या वरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी सरकारी रुग्णालयात जावं लागेल. अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निर्धारित केले आहेत. या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने complaint.epimumbai@gmail.com हा इ-मेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे.

राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रम हा दिनांक 16 जानेवारी 2021 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येत आहे. मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शासकीय तसेच महानगरपालिका केंद्रात विनामूल्य लसीकरण केले जात आहे तर खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लस देण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या मुक्त धोरणानुसार खासगी लसीकरण केंद्र लस उत्पादकाकडून लस खरेदी करून नागरिकांचे सशुल्क लसीकरण करू शकतात. यासंदर्भात दिनांक 8 जून 2021 रोजी केंद्र सरकारने खासगी लसीकरण केंद्राने लाभार्थ्याकडून आकारण्याचे दर निश्चित केले आहेत. या अनुषंगाने लस उत्पादकाने दिलेला दर तसेच अधिक 5 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि जास्तीत जास्त 150 रुपये सेवाशुल्क खासगी लसीकरण केंद्र लाभार्थ्याकडून घेऊ शकतात.

याअनुषंगाने लसनिहाय दरनिश्चिती खालीलप्रमाणे आहे.

1. कोविशिल्डः 600 30 150 = 780 रुपये

2. कोवॅक्सिनः 1200 60 150 = 1,410 रुपये

3. स्पुटनिक-व्हीः 948 47 150 = 1,145 रुपये

सरकारने निश्चित केलेल्या या दरांमध्ये बदल झाल्यास वेळोवेळी नागरिकांना कळविण्यात येईल.


यास्तव खासगी लसीकरण केंद्रांना कळविण्यात येते की, वर नमूद केलेल्या दरानुसारच लाभार्थ्यांकडून लसीकरण शुल्क आकारण्यात यावे. अवाजवी शुल्क आकारण्यात आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अवाजवी दर आकारण्यासंदर्भातील तक्रार complaint.epimumbai@gmail.com या ई-मेलवर नोंदविण्यात यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

First published: June 11, 2021, 8:54 PM IST

ताज्या बातम्या