मुंबई, 21 मार्च : मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, मलिक यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता आधी 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि 21 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते.
कोर्टाने मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला. मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, नवाब मलिक यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना खुर्ची, खाट आणि गादी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. कोर्टाने मलिक यांची मागणी केली असून कारागृहात मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. तसंच घरचे जेवण देण्याची मागणी केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अहवाल पाहिल्यानंतर मंजुरी दिली जाईल.
नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री!
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं 2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव ह नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे. नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्यानं त्यांची जबाबदारी तात्पुरती दिली जाणार आहे. त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रिपद, पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतलाा आहे. ही नावं मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर जाहीर करू, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
तर 'नवे पालकमंत्री म्हणून परभणीसाठी धनंजय मुंडे याचे नाव देण्यात आले आहे. तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव दिले आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलंय. जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था उभी करणार आहोत. नवाब मलिक हे बिनखात्याचे मंत्री म्हणून राहतील. मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.