मुंबई, 11 सप्टेंबर : कोरोना संकटकाळातही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल धावत आहे. लोकल मार्गावरील मेगा ब्लॉकबद्दल मध्य रेल्वेने परिपत्रक काढून माहिती दिली आहे. रविवारी (13 सप्टेंबर) 5 व्या आणि 6 व्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे, तर मेन लाइन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक नाही.
मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार 13 सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी 5 व्या आणि 6 व्या मार्गावर मेगा ब्लॉक संचालीत करणार आहे. ठाणे-घाटकोपर 5 व्या आणि 6 व्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 मेगा ब्लॉक असेल. घाटकोपर-लोकमान्य टिळक टर्मिनस 5 व्या आणि 6 व्या मार्गावर दुपारी 1 ते दुपारी 2.30 आणि दुपारी 3.15 ते संध्याकाळी 6.45 पर्यंत तसेच दिवा-कल्याण 5 व्या आणि 6 व्या मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 2.15 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. तथापि, वेळापत्रकानुसार विशेष उपनगरी सेवा चालवल्या जातील.
दरम्यान, पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हा देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.