मनाली पवार,मुंबई, 12 जून : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होता. मात्र सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा-कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, आंदोलन करणाऱ्या भाजप आमदाराविरुद्ध गुन्हा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर या आजारातून हे दोन्ही नेते बरे होऊन सुखरूप बाहेर पडले.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.