मुंबई, 21 जानेवारी : बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचे प्रकार आतापर्यंत अनेकदा समोर आले आहेत. मात्र आता वेबसिरीज आणि सिरीयलमध्ये कामं मिळवायलाही नवोदित महिला कलाकारांची लैंगिक पिळवणूक होत असल्याचं उघड झालं आहे.
मुंबई पोलिसांच्या CIU म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल 'कास्टिंग काऊच' रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या अभिनेत्री, मॉडेल यांची सुटका करण्यात आली. याच कास्टिंग काऊचप्रकरणी एका निर्मात्यासह दोन महिला अभिनेत्रींना CIU पथकाने म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथून अटक केली आहे.
या कास्टिंग काऊचमधील 8 पीडितांना कॅलेंडर शूट, वेबसिरीज तसंच चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्याने या तरुणींकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आलं आहे. यात चित्रपट क्षेत्रात सक्रिय असलेल्या एक निर्माता वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवीत असल्याची माहितीही चौकशीत उघड झाली आहे. प्रेम उर्फ संदीप इंगळे असं या निर्मात्याचे नाव असून अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने हे सेक्स रॅकेट या निर्मात्याने सुरू ठेवले होते.
CIU म्हणजेच गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एक सापळा रचला आणि बोगस ग्राहक तयार करून या तिघांशी संपर्क साधला. त्यानुसार तान्या आणि हनुफा यांनी व्हॉट्सअपवरून पसंतीसाठी मॉडेल्स आणि अभिनेत्रींचे फोटो पाठवले. त्यातील तरुणी पसंत केल्यावर पसंत केलेली तरुणी जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये येत असल्याचे माहिती या तिघांनी बनावट ग्राहकाला दिली. तरुणी पंचतारांकित हॉटेलमध्ये येताच सचिन वाझे आणि संतोष कोतवाल, रियाझुद्दीन काझी, नितीन लोंढे, कीर्ती माने, बिपीन चव्हाण, योगेश लोहकरे, म्हस्के यांनी छापा टाकून हॉटेलमधून आठ तरुणींची सुटका केली.
सुटका केलेल्या पीडित तरुणींची चौकशी केली असता काम देण्याच्या बहाण्याने या तरुणींची फसवणूक केली जात असल्याचे चौकशीत समोर आले. संदीप इंगळे आ2णि दोन महिला दलाल ज्या स्वत: मॉडेल आणि अभिनेत्री आहेत यांचा हा धंदा गेल्या पाच वर्षांपासून सुरु होता. हा धंदा चालवण्याकरता हे तिघं सोशल मीडियाचा वापर करत होते. तर एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली हे रॅकेट तरुणी पुरवीत असल्याचाही संशय पोलिसांना आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या कास्टिंग काऊचमध्ये बॉलिवूड आणि मॉडलिंग सोबतच वेबसिरीज आणि सिरीयल क्षेत्रात मोठं नाव असलेल्या काही दिग्गजांचा देखील समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता DC डिझाईन, बनावट सोशल मीडिया फॉलोअर्सनंतर कास्टिंग काऊच प्रकरणी बॉलिवूड मधील अनेक दिग्गजांना मुंबई पोलिसांच्या CIU पथकाच्या कार्यालयात हजेरी लावावी लागण्याची शक्यता आहे.