मुंबई, 12 जानेवारी : जगप्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलीप छाब्रियाची पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कोठडीत रवानगी केली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कृत्याप्रकरणी दिलीप छाब्रिया याला मुंबई पोलिसांच्या CIU पथकाने अटक केली होती.
या प्रकरणी पोलीस कोठडीनंतर दिलीप छाब्रियाची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. पण कॉमेडीयन कपिल शर्मा याने 7 जानेवारीला CIU पथकाकडे दिलीप छाब्रियाने त्याची 5 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारा दिली. कपिलने स्वत: करता एक व्हॅनिटी व्हॅन बनवण्यास दिलीप छाब्रियाशी व्यवहार केला होता. मात्र दिलीप छाब्रियाने कपिलला व्हॅनिटी व्हॅनही दिली नाही आणि त्याचे 5 कोटी 70 लाख रुपयेही दिले नाहीत, असा आरोप आहे.
या प्रकरणी काल सोमवारी 11 जानेवारीला मुंबई पोलिसांच्या CIU पथकाने मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालयात अटकेची मागणी केली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली आणि दिलीप छाब्रियाला अटक करण्याची परवानगी न्यायालयाने CIU पथकाला दिली. काल दिलीप छाब्रियाला अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिलीप छाब्रिायाला पुन्हा 1 दिवसाची CIU कोठडी सुनावली.
कोट्यवधी रुपयांच्या गाड्या आणि गाड्यांचे पार्ट लोनवर घेवून त्या गाड्यांची नोंद न करताच तसंच काही गाड्यांची फक्त कागदोपत्री नोंद करुन DC डिझाईन या कंपनीने अशाच प्रकरणाची अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासा समोर आलं आहे. याच अनुषंगे कपिल शर्माने देखील याआधी DC कंपनी विरोधात तक्रारार केली होती. त्यामुळे कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्याकरता बोलावले होते.
बॉलिवूड अभिनेता मुंबई पोलिसांच्या रडारवर
आता एक बॉलिवूड अभिनेता देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. कारण प्रसिद्ध कार डिझायनर DC अवंती प्रकरणी आता बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. या अभिनेत्याला कोणत्याही क्षणी मुंबई पोलिसांचे CIU पथक अटक करु शकते. या अभिनेत्याने DC डिझाईन कंपनी कडून गाडी खरेदी करण्याच्या कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र या अभिनेत्याने DC डिझाईन कंपनीची अवंती गाडी घेतली नसून फक्त आपल्या नावाचा वापर DC डिझाईन कंपनीला करण्यास दिला. जेणेकरुण या अभिनेत्याने DC डिझाईन कंपनीची अवंती गाडी घेतली असल्याचे भासवून इतरही DC डिझाईन कंपनीची अवंती गाडी घेतील.
दरम्यान. DC डिझाईन कंपनीच्या अवंती गाडी घोटाळा प्रकरणी धक्कादायक खुलासे झाले असून DC डिझाईन अवंती गाड्यांऐवजी इतर महागड्या गाड्या 68 गाड्या देखील DC डिझाईन कंपणीने कर्जावर घेतल्या होत्या. ज्यांची अंदाजे किंमत 150 कोटी रुपये सांगितली जात आहे. या 68 गाड्यांवर DC डिझाईन कंपनीने बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र या गाड्या सध्या अस्तित्वात नसून बँकांचे पैसे ही DC डिझाईन कंपनीने परत केले नसल्याचे तपासात समोर आले आहे.
BMW, Porsche, Meback, Benttaly, Range Rover, volvo या कंपन्यांच्या महागड्या गाड्यांच्या तसंच 36 लाख रुपयांची बाईक यांचा या 68 गाड्यांमध्ये समावेश आहे. मुंबई येथील DC डिझाईन कंपनीच्या शो रुमवर CIU च्या पथकाने छापा टाकला होता. तिथे एक गाडी सापडली. त्या गाडीमधील चेसी आणि इंजिनवर नंबरच नव्हते. तर DC डिझाईन कंपनीच्या पुणे येथील शो रुमवर CIU च्या पथकाने छापा टाकला होता.
या छाप्यात 14 DC डिझाईन कंपणीच्या गाड्या, 19 इतर कंपण्यांच्या गाड्या आणि 40 इंजिन सापडले आहेत. CIU पथकाला मिळालेल्या माहितीनुसार DC डिझाईन कंपनीने 400 गाड्यांचे इंजिन मागवले होते. त्यापैकी 127 गाड्यांमध्ये इंजिन लावून त्या गाड्या विकल्या गेल्या आणि टाकलेल्या पुणे येथील छाप्यात 40 इंजिन सापडले आहेत, तर उर्वरित 233 इंजिन कुठे आहेत याचा शोध CIU चे पथक घेत आहे.
29 डिसेंबरला दिलिप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि CIU पथकाचे वरीष्ठ अधिकारी सचिन वझे यांनी ही कारवाई केली असून दिलीप छाब्रिया यांच्या अटकेने खळबळ उडाली आहे. ही कारवाई सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, अप्पर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.