बंगळुरू, 10 जून- ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नांड यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना उपचारांसाठी अनेकदा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरीश यांनी कन्नडसोबतच हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये काम केलं. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशा सर्व पातळ्यांवर त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला. १९ मे १९३८ मध्ये माथेरानला त्यांचा जन्म झाला होता. १९९८ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
Girish Karnad, veteran actor and playwright, and Jnanpith awardee, passed away this morning. More details awaited pic.twitter.com/YiQT8kCEqD
सुप्रसिद्ध कन्नड साहित्यकार, रंगकर्मी, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी गिरीश कर्नाड यांची ओळख होती. गिरीश यांना १९७८ मध्ये भूमिका सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय १९९८ मध्ये साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. गिरीश कर्नाड हे असे हरहुन्नरी अभिनेते होते ज्यांनी व्यावसायिक सिनेमांसोबत समांतर सिनेमांमध्येही त्यांनी नाव कमावलं. १९७० मध्ये 'संस्कार' या कन्नड सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. १९७४ मध्ये आलेल्या जादू का शंख या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गिरीश कर्नाड यांना सलमान खानच्या 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या सिनेमांसाठी ओळखलं जातं. याशिवाय 'निशांत' (१९७५), 'शिवाय' आणि 'चॉक अँड डस्टर' या सिनेमांतही काम केलं होतं.