कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी BMC चा स्पेशल प्लॅन, ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे होणार सॅनिटायझेशन

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी BMC चा स्पेशल प्लॅन, ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे होणार सॅनिटायझेशन

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राजधानी मुंबईत आढळले आहेत. त्यातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्यास संपूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. या पार्श्वभूमीर मुंबई महानगरपालिकेनं धारावीसाठी स्पेशल प्लॅन आखला आहे.

धारावीतील ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोनच्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनकडून दीडशे डॉक्टर देण्यात येणार आहेत. ज्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती आहे.

त्यासोबतच दोन खाजगी डॉक्टरांबरोबर दोन बीएमसीचे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम धारावीतल्या साडेसात लाख रहिवाशांचे दहा दिवसात स्क्रीनिंग करतील. लक्षण आढळणाऱ्या लोकांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयसोलेशन साठी ठेवण्यात येणार आहे. या प्लॅनबाबत मुंबई महापालिका अधिकारी खासदार राहुल शेवाळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे.

हेही वाचा- धारावीत कोरोनाचा तिसरा बळी; मुंबईचा सगळ्यात धोकादायक हॉटस्पॉट

दरम्यान, धारावीतील कोव्हिड-19 संसर्गग्रस्त झालेल्या रुग्णांची वाढती संख्या ही अत्यंत गंभीर आणि काळजी वाढवणारी गोष्ट असून आपल्या अखत्यारित करता येणाऱ्या गोष्टींची आपणांस जाणीव करून देत आहोत, असं म्हणत धारावी पुनर्विकास समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबई पालिकेच आयुक्त प्रवीण परदेशी यांना एक पत्र लिहिले आहे.

पत्रात पालिकेकडे काय मागण्या केल्या?

- धारावीतील सर्व Health Post, मनपा संचालित dispensaries ज्या आजमितीस बंद आहेत, त्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात.

- धारावीतील सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांकडून पैसे आकारणे बंद केल्यामुळे, अनेक शौचालय चालकांनी शौचालये बंद केली आहेत वा पाणी - वीज खंडित केली आहे. अशी सर्व शौचालये ताब्यात घेऊन या संकट समयी मोफत सेवा पुरविण्यास तयार असलेल्या संस्थांना ती देण्यात यावीत.

शौचालयात जाताना व परतताना हात धुण्याकरिता पाणी - साबण किंवा sanitizer ची उपलब्धता ठेवावी.

- शौचाकरिता, किराणा घेणेकरिता तसेच औषधोपचाराकरिता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये, असे निर्देश द्यावेत. ( धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही, याची कृपया नोंद घ्यावी)

- धारावीतील उच्च घनता (साधारणतः 1 लाख घरे, बहुतांश दुमजली. अंदाजे लोकसंख्या 15 लाख) तसेच सरासरी 100 चौ.फु. क्षेत्रफळाच्या घरात राहणारे किमान 6 ते 8 जणांचे कुटुंब ही परिस्थिती लक्षात घेता घरातही social distancing पाळणे शक्य नाही. ही लोकं काहीकारणे बाहेर येतीलच. ती त्यांची अपरिहार्यता आहे. ही बाब लक्षात घेवून धारावी संपूर्णत: सिल करण्याचे खूळ डोक्यातून काढून टाकावे.

- हेल्थ पोस्टच्या पॅरा मेडिकल स्टाफला प्रशिक्षित करून, धारावीतील घरोघरी जावून कोरोनाची टेस्ट करण्याची व्यवस्था करावी.

- धारावीतील सर्व खाजगी दवाखाने (dispensaries) तात्काळ सुरू करणे, RMP doctors ना अनिवार्य करावे. असे न करता सेवा देण्यापासून पळ काढणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

- धारावीतील पर राज्यातील मजुरांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशांना शासनाच्या वतीने पुरविणे आवश्यक असलेले मोफत अन्न - धान्याचे वितरण तात्काळ सुरू करावे.

- धारावीतील 51 बेड्सचे ' साई हॉस्पिटल ' पालिकेने ताब्यात घेतले आहे, त्याचप्रमाणे धारावीतील पालिकेचे "Urban Health Center" ची इमारत ताब्यात घेऊन ती वापरात आणावी. धारावीपासून जवळच असलेले शीव येथील ' शेठ र. व. आयुर्वेद रुग्णालय ' सुद्धा ताब्यात घेता येऊ शकते. तसेच धारावी परिसरातील रहेजा, हिंदुजा, मेहता, लिलावती आदी विश्वस्त न्यासांच्या रुग्णालयातील काही बेड्स ताब्यात घेण्यात यावीत

संपादन- अक्षय शितोळे

First published: April 9, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या