मुंबई 24 मार्च : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलंय. त्याला अटकाव करण्यासाठी पुढचे21 दिवस भारत लॉकडाउन करण्यात आलाय. महाराष्ट्र आणि मुंबईतही कोरोना वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एक चांगली सुविधा उपलब्ध केली आहे. जे लोक होम क्वारंटाइन आहेत अशा लोकांना काही लक्षणं आढळली तर त्यांना थेट महापालिकेशी संपर्क साधून टेस्ट करण्यासाठी घरी सुविधा विळणार आहे. त्यासाठी पालिकेने 30 डॉक्टरांचं एक पथक तयार केलं आहे अशी माहिती आज देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. आता उद्यापासून पुढचे 21 दिवस हा लॉकडाउन असेल. पण ही घोषणा होताच नागरिक मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. उद्यापासून लॉक डाउन म्हणजे नेमकं काय याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
पुण्याचे जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांनी लॉकडाउनध्येही जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकानं बंद होणार नाहीत, हे स्पष्ट केलं. अनेक शासकीय अधिकारीही आवाहन करत होते की, पॅनिक होऊ नका. घाबरू नका.
महाराष्ट्रात 22 तारखेपासून लॉक डाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीत फार फरक राहणार नाही. फक्त अनावश्यक कारणांसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांवर मात्र कारवाई होऊ शकते.