मुंबईतील कोरोना रुग्णावर परस्पर अंत्यसंस्कार का केले? अखेर पालिकेने केला खुलासा

मुंबईतील कोरोना रुग्णावर परस्पर अंत्यसंस्कार का केले? अखेर पालिकेने केला खुलासा

'संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शवागारात मृतदेह राखण्याबाबतच्या नियमावलीचे संपूर्ण पालन या कालावधीमध्ये करण्यात आले होते.'

  • Share this:

मुंबई, 1 जून : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र त्याबाबात आता मुंबई महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. वडाळा येथील रहिवासी असलेल्या व जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार होत असताना मृत पावलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले, या आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर आता याप्रकरणी पालिकेने खुलासा केला आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात वडाळा येथील रहिवासी असलेले राकेश वर्मा (वय 41 वर्ष) यांना कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून उपचारार्थ 11 मे रोजी रात्री साडेअकरा वाजता दाखल करण्यात आले होते. रक्तदाब, स्थूलपणा व हायपरथॉयराईड या इतरही आजारांनी ग्रस्त असलेल्या वर्मा यांना कोव्हिड बाधित म्हणून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी 60 टक्केच होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना योग्य व आवश्यक ते सर्व उपचार देण्यात आले. तथापि, 6 दिवसानंतर दिनांक 17 मे रोजी 12.45 वाजता वर्मा यांची प्राणज्योत मालवली.

वर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा संपर्क होऊ शकला नाही. यामुळे याबाबतची माहिती रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांना देण्यात आली. वर्मा हे वडाळा येथील रहिवासी असल्याने त्याची माहिती वडाळा पोलीस ठाणे येथे कर्तव्यार्थ असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना दिनांक 17 मे रोजी पहाटे 2 वाजता (रुग्णाच्या मृत्यूनंतर तासभरात) देण्यात आली. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याची माहिती दिनांक 18 मे रोजी वडाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राकेश वर्मा हे कोविड संक्रमण बाधित रुग्ण होते. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शवागारात मृतदेह राखण्याबाबतच्या नियमावलीचे संपूर्ण पालन या कालावधीमध्ये करण्यात आले होते. मात्र, नातेवाईकांशी संपर्कच होत नसल्याने सुमारे 27 तासानंतर अखेर वडाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे 18 मे रोजी पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी मृतदेहाचा ताबा देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिला नाही व त्यानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आले, असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 1, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading