धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 2 फेब्रुवारी : रेल्वेनं प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला आर्थिक मदतीची याचना करणारे आपल्याला अनेक भेटतात. मुंबईसारख्या महानगरात तर या व्यक्तींची मोठी संख्या आहे. त्यामधील अगदी बोटावर मोजता येतील इतकीच मंडळी आपल्या लक्षात राहतात. ही मंडळी त्यांच्यातील वेगळेपणामुळे लक्षात राहातात. असाच एक व्यक्ती आता दादरकरांच्या ओळखीचा झाला आहे. तुम्हीही रोज दादर स्टेशनवरुन प्रवास करत असाल तर ही व्यक्ती तुम्हालाही माहिती असेल.
दादरमध्ये नियमित वावरणाऱ्यांना परिचयाच्या असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे इरशाद शेख. इरशाद गेली 22 वर्ष दादरकरांना बासरीचे मधूर सुर ऐकवत आहेत. मुळचे कल्याणचे असलेले इरशाद हे अंध आहेत. ते उपजिवेकेसाठी भिक्षा मागतात. त्यांच्या बासरीचे स्वर इतके मधूर आहेत की अनेक जण रोजच्या धावपळीतही इरशादजवळ जाऊन त्यांची बासरी ऐकतात. त्यांना आर्थिक मदत करतात.
कशी लागली बासरीची गोडी?
इरशाद लहानपणापासून बासरी वादक नव्हते. त्यांना बासरीची गोडी कशी लागली याची देखील एक खास गोष्ट आहे. इरशाद यांनी त्यांच्या शाळेतील एक खास गोष्ट यावेळी सांगितली. 'मी शाळेत असताना गाणी म्हणत असे. माझा आवाज चांगलाय. मला गाणी म्हणाला आवडतात. पण, मी बासरी वादक नव्हतो. आमच्या शाळेत बऱ्याच बासरी होत्या. त्या कुणालाही वाजवता येत नसत. एके दिवशी आमच्या संगीत शिक्षकांनी सर्व बासऱ्या बाहेर काढल्या.
मेलोडिकाच्या स्वरांनी शिवाजी पार्क प्रसन्न करणारा कलाकार, पाहा Video
आम्हाला त्यांनी स्वरांबद्दल माहिती विचारली. संपूर्ण वर्गात फक्त मी त्याबद्दल अचूक माहिती दिली. माझ्या उत्तरांमुळे सर खुश झाले. त्यांना मी चांगली बासरी वाजवू शकेल असा विश्वास वाटला. त्यांनी मला बासरी शिकवायला सुरुवात केली. मी गायनाचा विद्यार्थी असल्यानं मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. मी बासरी लगेच निवडली.' असे इरशाद सांगतात.
गायक असूनही बासरीची निवड का?
इरशाद यांनी गायक असूनही बासरीची निवड का केली याचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले,' मी उत्तम गायक आहे. पण, मला गायनात करिअर करायचं असेल तर त्यात खूप स्पर्धा आहे. गायनाचे अनेत कार्यक्रम होतात. बरेच गायक आहे. मी या स्पर्धेत उतरलो तर माझा किती टिकाव लागेल? यशस्वी गायक होण्यासाठी किती वेळ लागेल? या सर्वांचा मी विचार केला आणि हातामध्ये बासरी घेतली.
इरशाद शेख गेली 22 वर्ष दादर स्टेशनवर बासरी वाजवत आहेत. त्यांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. स्वरांची उत्तम जाण असलेली मंडळी माझी बासरी खूप वेळ ऐकतात. त्यांच्याकडे एखादा कार्यक्रम असेल तर मला बोलावतात. माझी या कार्यक्रमातून आर्थिक कमाई देखील होते. मी या पद्धतीचे कार्यक्रमही केलेत. हे कार्यक्रम मला दादर स्टेशनवरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे मिळाले आहेत. त्यांना माझ्या बासरीचे सूर आवडतात. त्यामुळे ती तिथं थांबून मला थोडीफर आर्थिक मदत करतात. त्या मदतीवरच माझं घर चालतं,' असं इरशाद यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.