Home /News /mumbai /

मुंबईमध्ये Blackout! हे आहेत शहरातील या क्षणाचे महत्त्वाचे 10 अपडेट

मुंबईमध्ये Blackout! हे आहेत शहरातील या क्षणाचे महत्त्वाचे 10 अपडेट

आठवड्याचा पहिला दिवस मुंबईकरांसाठी आणखी एक समस्या घेऊन आला. सोमवारी सकाळी अचानक मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे.

    मुंबई, 12 ऑक्टोबर : मुंबईकरांसाठी 2020 वर्षाचा कठोरपणा अद्याप संपलेला दिसत नाही आहे. कोरोना, तुफान पाऊस, लॉकडाऊन, लोकल बंद या समस्यांना मुंबईकर तोंड देतोय ना देतोय तोपर्यंत आजच्या दिवसाची सुरुवात आणखी एका घटनेने झाली. आठवड्याचा पहिला दिवस मुंबईकरांसाठी आणखी एक समस्या घेऊन आला. सोमवारी सकाळी अचानक मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. यानंतर लोकलपासून ऑफिसच्या कामापर्यंत अनेक गोष्टी पूर्णत: बंद झाल्या आहेत. या घटनेशी संबंधित 10 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या इथे 1. आणखी तासाभरात सर्व वीजपुरवठा सुरळीत होईल असे BMC BeEST कडून देण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील एक ते पाऊण तासात वीज पुरवठा सुरळीत होईल असे म्हटले आहे. 2. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट इलेक्ट्रीकने ट्वीट करून माहिती दिली आहे.  'टाटा इलेक्ट्रिककडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.' अशी माहिती बेस्टने दिली आहे. तसंच, झालेल्या  गैरसोयीबद्दल बेस्टने दिलगिरी व्यक्त केली आहे. 3. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कुर्ला ते सीएसटी दरम्यान लोकल ठप्प झाल्या आहेत. अर्ध्या तासाहून अधिक काळापेक्षा प्रवासी याठिकाणी खोळंबले आहेत. दादर स्टेशनवर देखील गाड्या ठप्प आहेत. 4. मुख्य समस्या कळव्यामध्ये असल्याचे समोर आले आहे. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 मध्ये देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भाग प्रभावित आहे. (संबंधित-पहिल्यांदाच अख्ख्या मुंबईचे लाईट गेले! लोकल, ऑफिसं सर्व ठप्प; पाहा PHOTOS) 5. कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले आहे. टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे 380 मेगावॅट वीज पुरवठ्याला फटका बसला आहे. 6. मंत्रालयातील लिफ्टमध्ये देखील काही कर्मचारी अडकले आहेत. अचानक वीज गेल्याने लिफ्ट बंद आहे. मंत्रालयाच्या इमारत परिसरात बऱ्याच भागात अंधार आहे. 7.वीज पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर रुग्णालयातील रुग्णांवरही परिणाम होऊ शकतो. प्रत्येक रुग्णालयात विजेचा बॅकअप असतो पण त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे विजेचा पुरवठा पूर्ववत होण रुग्णालयातील रुग्णांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. कोरोणामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर लावावे लागते अशा वेळी प्रत्येक रुग्णालयाची विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे बॅकअपला असलेली वीज लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. (संबंधित-मुंबईत वीज पुरवठा ठप्प होण्याचे कारण आले समोर, बेस्टने केला खुलासा) 8. टाटा पॉवर कंपनीच्या ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे 10 वाजून 5 मिनिटांनी ट्रॅक्शन पॉवरमध्ये व्यत्यय आला. त्यानंतर चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. 9. पण वसई रोडमधील एमएसईटीसीएलकडून वीजपुरवठा उपलब्ध आहे. त्याचा विस्तार बोरिवली ते विरार दरम्यानच्या उपनगरी गाड्यांच्या कामकाजासाठी करण्यात आला आहे. चर्चगेट-बोरिवली विभागात सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांनी न घाबरण्याचे आणि सोशल डिस्टन्स पाळण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 10. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या