रत्नागिरी, 5 डिसेंबर: रत्नागिरी (Ratnagiri)जिल्ह्यातल्या खेडमध्ये (Khed) रक्ताचा (Blood) मोठा तुटवडा आहे. तर दुसऱ्या बाजूला खेडमधील रुग्णांना रक्ताची बॅग (Blood Bag) आणण्यासाठी 70 ते 80 किलोमीटर लांब जावं लागत आहे. एवढंच नाही तर चौपट पैसे मोजूनही रुग्णासाठी रक्त उपलब्ध होत नसल्याचं विदारक वास्तव समोर आलं आहे.
खेड बरोबरच दापोली आणि मंडणगड या तालुक्यांसाठी रक्ताचा मोठा तुटवडा तर आहेच शिवाय रक्ताचा मोठा काळाबाजार करण्यात येत आहे. 500 रुपयांना मिळणारी रक्ताची एक पिशवी 1800 ते 2000 रुपयांना खरेदीकरून घ्यावी लागत आहे.
हेही वाचा...'या' राज्यात पहिली ते आठवी 31 मार्चपर्यंत शाळा बंद, 10-12वी बोर्ड परीक्षा होणार
मिळालेली माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यात तीन रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी दोन रत्नागिरी तर एक चिपळूण येथे आहे. मात्र, खेडमध्ये शासनानं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँक सुरू करावी. अशी मागणी समोर आली आहे. त्याचबरोबर रक्ताचा होणार काळाबाजार थांबवावा आणि हा गोरखधंदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन...
राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. जनतेनं स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तदान करावं, असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.
युवावर्ग रक्तदानाचा महत्त्वाचा स्त्रोत...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविद्यालयातील युवावर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे राज्यातील महाविद्यालये सध्या बंद आहेत. त्याचबरोबर रक्तदानात अग्रेसर असलेल्या बहुतांश कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम (Work Form Home)करत आहेत. त्यामुळे रक्त संकलनात मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कोरोना हा अज्ञात शत्रू असून त्याच्याशी दोन हात करण्यासाठी राज्यातील डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी मोलाचं योगदान देत आहेत. कोरोनारुग्णांवर उपचारात कोणतीही कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारं ठोस उपासयोजना केली आहे. मात्र, राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्यामुळे रुग्ण त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा...कर्नाटक राज्यात 20 डिसेंबरपासून कडक निर्बंध, नववर्षाच्या सेलिब्रेशनवरही बंदी?
धक्कादायक 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा..
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्यात 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. राज्यात एकूण 344 रक्तपेढ्या असून त्यात 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आहेत. तर प्लेटलेटच्या 2583 युनिट आहेत. मुंबईत 58 रक्तपेढ्या असून त्यात 3239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत.