मुंबई, 18 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून फारकत घेत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर सेना-भाजपमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगत आहे. अशातच आता शिवसेनेचं वर्चस्व असणारी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली असून 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजप कार्यकारिणीत याबाबतची घोषणा झाली.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसह भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल फुंकलं आहे.
भाजप-शिवसेनेत होणार राजकीय संघर्ष
शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई आणि शिवसेना हे समीकरण घट्ट झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र आता शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे गेले होते. तेव्हा शिवसेनेला सत्ता राखण्यात यश मिळालं असलं तरीही भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फारसं अंतर नव्हतं.
या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसोबत राज्याच्या राजकारणात संघर्ष होत असतानाच भाजपने मुंबई महापालिकेवरही लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीबाबत आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी होतात, हे पाहावं लागेल.