धुसफूस कायम, भाजपच्या बैठकीत विखे पाटील पिता-पुत्राचा आज फैसला?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • Share this:
मुंबई,27 डिसेंबर: विधानसभी निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमधील धुसफूस काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता. पण माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे. आजच्या बैठकीत ही सगळी खदखद बाहेर पडेल, अशी चर्चा आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे.अहमदनगर जिल्हा निवडणूक आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजप नेते भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे आदी नेते बैठकीला उपस्थित आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता आहे. काय म्हणाले राम शिंदे? आजच्या बैठकीत आम्ही आमच्या व्यथा मांडणार असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले आहे. निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर काय झाले हे आम्ही पक्षाला आधीच कळवले आहे. आता कारवाईची अपेक्षा असल्याचे राम शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, निवडणुकीचा आढावा तसेच आगामी काळात आंदोलने, संघटनात्मक काम या सर्व मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 'संविधान सम्मान' नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरुन शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत वातावरण तापणार असून कायद्याच्या बाजूने आणि विरोधात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. भाजपतर्फे दुपारी 4 वाजता ॲागस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी इथला टिळक पुतळा असा संविधान सम्मान मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून आजचा मोर्चा त्याचाच एक भाग आहे. तर दुसरीकडे, आझाद मैदानात या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. जाॅईंट ॲक्शन कमिटी फाॅर सोशल जस्टिस तर्फे हे आंदोलन केले जाणार आहे. यात जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, अभिनेत्री स्वरा भास्कर सामील होणार आहेत. दुपारी 3 वाजता हे आंदोलन होणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: