Home /News /mumbai /

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाची फिल्डिंग, महाविकास आघाडीला जागा दाखवून देण्याचा निर्धार

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपाची फिल्डिंग, महाविकास आघाडीला जागा दाखवून देण्याचा निर्धार

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्षाने कंबर कसली असून, ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षाने फोकस केले असल्याची माहिती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.

    मुंबई, 5 जानेवारी : कोरोनाचं संकट कमी होत असताना, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीची (BJP) तयारी सुरु झाली आहे. पाच आणि सहा जानेवारीला भाजपाच्या संघटनात्मक बैठका मुंबईत पार पडत आहेत. यातच भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्षाने कंबर कसली असून, ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षाने फोकस केले असल्याची माहिती भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित आव्हान कसे रोखायचे या रणनीतीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील महाविकास आघाडीविरोधात भाजपाने जोरदार आघाडी उघडण्याचे ठरवले असून, येत्या काळात पक्षातील 12 वरिष्ठ नेते हे राज्य पिंजून काढणार आहेत. महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा विश्वास या बैठकीनंतर शेलार यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीवर टीका करण्याची संधी यानिमित्ताने शेलार यांनी सोडलेली नाही. सरकारमध्ये असलेले पक्ष एकटेपणाने आमचा सामना करु शकत नाहीत. तीन दुर्बळ विरुद्ध एक स्वबळ असा हा संघर्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आयाराम-गयारामांच्या मुद्द्यावरही शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तोडफोडीवरुन इतरांवर टीका करायची आणि प्रत्यक्षात आपण तेच करायचं, हेच महाविकास आघाडीतील पक्ष करत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीचे पडघमही वाजू लागले असल्याने आगामी काळात मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा जनाधार कसा कमी करता येईल, यावर भाजपाचा आगामी काळात जोर असणार आहे, हे उघड आहे. शिवसेना गुजराती मतदारांसाठी कार्यक्रम राबवित असल्याचे आज समोर आल्यानंतर, याही मुद्द्यावर शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचा मतदार घसतो आहे, त्यामुळे कृत्रिम वलय निर्माण करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. संघटनात्मक बैठका सातत्याने पक्षात सुरु असतात, मुंबईत पार पडत असलेल्या बैठका हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या