मुंबई, 08 फेब्रुवारी : 'भाजपचे (BJP) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे माझे चांगले मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात. त्यांचं बोलणं हीच त्यांची फक्त खासियत आहे' अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली आहे. तसंच, जर ऑपरेशन लोटस झाले तर राज्यात भाजपचा राहणार नाही' अशी टीकाही पटोले यांनी केली.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रावर दौऱ्यावर येऊन गेले. 'आपण जे काही राज्यात राजकारणात करायचं ते छातीठोक करतो, सेनेला आपण कोणतेही वचन दिले नव्हते, उलट त्यांनी फसवले. भाजप साखर कारखानदारांना कोण धमकावत असेल तर घाबरत नाही, ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांनी जर तशा स्वरूपाचे वागले असते तर शिवसेना राहिली नसती' असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात परत एकदा ऑपरेशन लोटस होणार का? ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शहांच्या विधानाचा समाचार घेत जोरदार पलटवार केला आहे.
विरोधी पक्ष नेते फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात. त्यांचं बोलणं हीच त्यांची फक्त खासियत आहे. पण त्यांनी पुढे पत्रिका दाखवली आहे का? ती राज्यात भाजप सरकार येईल कारण ते कदाचित जास्त पत्रिका पाहतात, अशी कडवट टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. तसंच, अमित शहा यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवार 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी यांनी दिली आहे. 1942 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून 'अंग्रेजो चलो जावो भारत छोडो' हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, नाना पटोले