...तर भाजप विरोधी पक्षात बसणार, गडकरींना भेटल्यानंतर 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य

...तर भाजप विरोधी पक्षात बसणार, गडकरींना भेटल्यानंतर 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल.'

  • Share this:

अभिषेक पांडे, मुंबई 8 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये जो पेच निर्माण झालाय त्यात नितीन गडकरींनी मध्यस्ती करावी असा आग्रह धरला जातोय. पण नितीन गडकरींनीच अनेकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि महायुतीच सरकार येईल असं म्हटलंय. त्यामुळे शिवसेना गडकरींच्या मध्यस्तीसाठी तयार होईल का याबद्दल शंका व्यक्त केलीय जातेय. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आज मुंबईत नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीनंतर विनोद तावडे यांनी महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे पेच आणखीच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.विनोद तावडे म्हणाले, शिवसेनेला काही प्रस्ताव दिले आहेत. आता कोणता प्रस्ताव स्वीकारावा याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

संभाजी भिडेंची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, राजकीय समीकरणांवर खलबतं?

ते पुढे म्हणाले, आमच्या कडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. त्यानंतर राज्यपालांनी आम्हाला बोलावलं तर आम्ही आमच्याकडे बहुमत नाही असं त्यांना सांगू. नंतर राज्यपाल शिवसेनेला बोलावतील. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेत आली तर आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. पण असा निर्णय घेणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल असंही त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलताना सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं हे शिवसेनेला परवडणारं नाही, याची जाणीव शिवसेनेलाही आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ते आमच्यासोबत येतील असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.

सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपालांकडे आहेत 3 पर्याय

शरद पवाराच्या भूमिकेकडे लक्ष

सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर महाराष्ट्र राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल करतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटूनही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकलेला नाही. ‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते. पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.

उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का, मुंबईत पोहोचलेले नितीन गडकरी म्हणाले...

शरद पवार हे आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावर चर्चा करण्यासाठी वकील माजीद मेमन हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक इथं पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा न केल्यास शिवसेना सोबत घेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण हा पाठिंबा दिल्याचं स्पष्टीकरण तेव्हा शरद पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकाड गाठता आलेला नाही. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा राजकीय डावपेच टाकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या