मुंबई, 25 फेब्रुवारी : अधिवेशनाच्या कालावधीवरुन सरकार आणि विरोधकांची कामकाज सल्लागार समितीत जोरदार खडाजंगी झाली. कोरोनाचं कारण देऊन अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेत सरकारवर हल्लाबोल केला. याच मुद्द्यावरून संतापलेले देवेंद्र फडणवीस हे बैठकीतून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.
1 मार्चपासून होत असलेल्या अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, अनिल परब यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
हेही वाचा -नाना पटोलेंनंतर कोण होणार विधानसभा अध्यक्ष? निवडणुकीबाबत हालचालींना वेग
बैठकीत फडणवीस, मुनगंटीवार, शेलार यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात आक्रमक हल्लाबोल केला. अधिवेशन कालावधीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद झाला आणि देवेंद्र फडणवीस हे बैठक सोडून निघून गेले.
अधिवेशनाबाबत काय निर्णय झाला?
अर्थसंकल्प न मांडता लेखानुदानाचा पर्याय भाजपने दिला होता. लसीकरण करुन मग पुढच्या महिन्यात अधिवेशन घेण्याचा पर्यायही भाजपने सांगितला होता. मात्र विधीमंडळाचा अधिवेशन 1 ते 10 मार्च यादरम्यान होणार आहे. 1 ते 5 मार्च या दरम्यान राज्यपाल, अभिभाषण, त्यावर चर्चा, शोकप्रस्ताव, पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.