Elec-widget

'आंदोलक झाले आता दाऊदवरचे गुन्हे महाराष्ट्र सरकार मागे घेईल'

'आंदोलक झाले आता दाऊदवरचे गुन्हे महाराष्ट्र सरकार मागे घेईल'

मुंबई भाजपचे नेते मोहित भारतीय यांनी ट्विटरवरून त्यांच्या या निर्णयावर टिप्पणी केली आहे. आता गुन्हे मागे घ्यायचा हंगाम असून त्वरा करा काहीच दिवस उरले आहेत असा टोलाही लगावला आहे.

  • Share this:

मुंबई 02 डिसेंबर : आरे कारशेडला विरोध करताना आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतले होते. त्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधातल्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यामध्ये मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी ट्विटरवरून त्यांच्या या निर्णयावर टिप्पणी केली आहे. आता गुन्हे मागे घ्यायचा हंगाम असून त्वरा करा काहीच दिवस उरले आहेत असा टोलाही लगावला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट करताना म्हटलं की, सूत्रांच्या माहितीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवरचे सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता. लवकरच महाराष्ट्र सरकार क्लीन चीट देणार कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरू आहे. आता घाई करा... थोडेच दिवस उरले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका करताना केलेल्या या ट्विटवर काही युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आरे आणि नाणारमध्ये आंदोलन करणाऱ्या स्थानिक, पर्यावरणवाद्यांची तुलना थेट कुख्यात डॉन दाऊद याच्याशी केल्यानं मोहित भारतीय यांना ट्रोलही केलं जात आहे.

Loading...

दरम्यान, नाणार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात येणार असल्यानं कोकणातल्या आंदोलकांना दिलासा मिळालाय. कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलनात उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत युती करताना शिवसेनेनं हा प्रकल्प रद्द करण्याची अटच भाजपला घातली होती. त्यामुळे कोकणातला हा प्रकल्प बारगळला होता. निवडणुकीच्या काळात त्यावरून राजकारणही तापलं होतं. आता सरकार बदलल्याने या प्रकल्पाविषयी या सरकारची काय भूमिका राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खटले मागे घेतल्याने गढ असलेल्या कोकणात शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.

आरे बाबतचे उद्धव ठाकरेंचे दोन मोठे निर्णय

आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच प्रकरणात आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय. आरे कारशेडविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. आरे कार शेड मधील झाडं तोडताना पर्यावरण कार्यकर्त्यांनी वृक्ष तोडीला विरोध करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पर्यावरण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हेच गुन्हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com