Home /News /mumbai /

पुन्हा येणारच! ‘बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत’

पुन्हा येणारच! ‘बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत’

भाजपने फडणविसांना बिहार निवडणुकीचं प्रभारीपद दिलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी बिहारमध्ये जात जागावाटपासून ते प्रचारापर्यंत सगळं नियोजन केलं. मात्र नंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं.

    मुंबई 10 नोव्हेंबर:  महाराष्ट्रातली सत्ता गेल्यानंतर काहीसे बॅकफुटवर गेलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बिहारमधल्या निकालांनी शक्ती मिळणार आहे. फडणवीसांना पक्ष श्रेष्ठींनी दिलेली ही पहिलीच राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी होती. आता राज्यातली भाजपला बळ मिळण्याची शक्यता असन त्याचे संकेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. नितेश राणे यांनी सूचक ट्विट करत एक प्रकारे पुढच्या वाटचालीचे संकेतच दिले आहेत. बिहार देवेंद्रजींनी आणले.. आता.. महाराष्ट्रला पण देवेंद्रजीच पाहिजे. पुन्हा येणार..येणारच! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. भाजपने फडणविसांना बिहार निवडणुकीचं प्रभारीपद दिलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी बिहारमध्ये जात जागावाटपासून ते प्रचारापर्यंत सगळं नियोजन केलं. महाराष्ट्रातून त्यांचे खास शिलेदारही बिहारमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्रचारालाही वेगात सुरूवात केली होती. मात्र नंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. आता ते आपल्या निवासस्थानीच आराम करत आहेत. काही दिवसांनी ते पुन्हा सक्रिय झाल्यानंतर राज्यातल्या राजकारणात हालचाली आणखी वाढणार आहेत. बिहार निवडणूक (Bihar Assembly Election 2020 Result) अनेक अर्थांनी राजकीय ट्रेंड सेटर ठरू शकते. आतापर्यंत स्पष्ट कल नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली NDA ला मिळालेला दिसतो. पण तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधनसुद्धा फार मागे नाही. त्यामुळे लढाई कमालीची चुरशीची होत आहे. पण आघाडी आणि गठबंधनापलीकडे जाऊन प्रत्येक पक्षाची कामगिरी स्वतंत्रपणे जोखली तर मुख्यमंत्रिपदाचे दोन्ही दावेदार निष्प्रभ ठरू शकतील, अशी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता अधिक आहे. बिहार निवडणूक निकालांच्या आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांवरून सर्वात जास्त स्ट्राइक रेट डाव्यांनी (Left parties in Bihar) मारला आहे. त्याखालोखाल भाजपची कामगिरी (BJP seats in Bihar) चांगली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूची कामगिरी सर्वात सुमार झाली आहे आणि राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्या पक्षाची कामगिरीही फार चांगली झालेली नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा या दोन्ही पक्षांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Bihar Election, Devendra Fadnavis

    पुढील बातम्या