'गावात भांडण सुरू झालं आहे', नितेश राणे ठाकरे सरकारवर संतापले

'गावात भांडण सुरू झालं आहे', नितेश राणे ठाकरे सरकारवर संतापले

भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सोडवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील इतर भागातील लोकांचं काय? असाही प्रश्न विचारला जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

'राज्य सरकारने एकदाच काय ते मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांच्या बदल धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म..कधी नाव मागितली जात आहेत..कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत..त्यामुळे गावात भांडणे सुरू झाली आहेत. सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे,' असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

सरकारने काय केला होता खुलासा?

मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. राज्य सरकारकडून आता याबाबत महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

1. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना आहेत.

2. असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.

3. मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे.

4. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

First published: May 3, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading