राज्यभर 'रामलीला' आयोजनाची परवानगी द्या, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यभर 'रामलीला' आयोजनाची परवानगी द्या, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात बार, हॉटेल्स, वाहतूक अशा सगळ्याच गोष्टी खुल्या झालेल्या असताना मंदिरं बंद ठेवणं हे अनाकलनीय असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई 16 ऑक्टोबर: राज्यात कोरोनाची साथ सुरू असताना आता राजकारणही तापलं आहे. राज्य सरकारने Unlockच्या प्रक्रियेतंर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरू केल्या आहेत. भाजपने राज्यात मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. त्यातच आता भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यभर रामलीलेचं आयोजन करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात मंदिरं खुली करण्याचा वाद पेटलेला आहे. यावरून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. राज्यभर आंदोलन उभारत मंदिरं आणि सगळीच प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी भाजपने केली आहे. तर अशी प्रार्थनास्थळे खुली केली तर कोरोनाची साथ आणखी वाढण्याचा धोका असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशातल्या अनेक राज्यांमध्ये मंदिरं खुली झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकार का घाबरवत आहे असा सावल भाजपने केलाय. राज्यात बार, हॉटेल्स, वाहतूक अशा सगळ्याच गोष्टी खुल्या झालेल्या असताना मंदिरं बंद ठेवणं हे अनाकलनीय असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

त्यामुळे शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच राम कदम यांनी रामलीला साजरी करण्यासाठी परवानगी मागितल्याचं बोललं जात आहे. आता नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दसरा आहे. या काळात रामलीलेचं आयोजन पारंपरिक पद्धतीने केलं जातं. मात्र यावेळी कोविडची साथ असल्याने अशी परवानगी देणं शक्य नाही. या आधीच शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी, यात्रा, जत्रा, उत्सव असं सगळंच स्थगित करण्यात आलं होतं.

मंदिरं सुरू करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरूनही मोठं रामायण झालं होतं. राज्यपालांची भाषणा योग्य नाही अशी टीका केली गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहूनच त्याची तक्रार केली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 16, 2020, 2:59 PM IST

ताज्या बातम्या