Home /News /mumbai /

मैदान नामकरणाचा वाद चिघळला, भाजपचे आमदार-खासदार घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?

मैदान नामकरणाचा वाद चिघळला, भाजपचे आमदार-खासदार घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?

तुम्ही नामकरण थांबवायला हवं होतं. तुम्ही हा जनक्षोभ पाहताय. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचं तुमचं काम आहे, असं अतुल भातखळकर पोलिसांना म्हणाले.

    मुंबई, 26 जानेवारी : मुंबईच्या मालाडमध्ये प्रचंड गदारोळ बघायला मिळतोय. मालाड येथील क्रीडा संकुलाचं टिपू सुलतान असं नामकरण करण्यात येतंय. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख टिपू सुलतान यांच्या नावासाठी आग्रही आहेत. नामांतराचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. पण त्याआधीच मैदानाच्या बाहेर प्रचंड गदारोळ बघायला मिळतोय. भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते मैदानाच्या बाहेर आंदोलनासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून टिपू सुलतान यांच्या नावाला तीव्र शब्दांत विरोध केला जातोय. विशेष म्हणजे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि खासदार गोपाळ शेट्टी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अतुल भातखळकर हे पोलिसांना नामांतराचा कार्यक्रम थांबविण्याचं आवाहन करत आहेत. अतुल भातखळकर पोलिसांना नेमकं काय म्हणाले? "आमचं आंदोलन होणार होतं त्यामुळे तुम्ही आम्हाला आंदोलनासाठी जागा द्यायला हवी होती. नाहीतर कार्यक्रम थांबवायला हवा होता. तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं करुन एकदम शांतपणे आम्हाला आंदोलनासाठी जागा द्यायला हवी होती. ते तुम्ही केलं नाही. हे मुळात बेकादेशीर आहे. तुम्ही नामकरण थांबवायला हवं होतं. तुम्ही हा जनक्षोभ पाहताय. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचं तुमचं काम आहे. पण तुम्ही खऱ्याच्या बाजूवर अत्याचार करत आहात. तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. हा कार्यक्रम थांबवला जाईल. तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला. तुम्ही मंत्र्यांना का घाबरताय? तुम्ही त्यांना विनंती करा", असं आमदार अतुल भातखळकर पोलिसांना सांहताना दिसले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी हे देखील उपस्थित होते. त्यांनीही पोलिसांसोबत बातचित केली. (रशिया आणि अमेरिका यांच्यातील वादात जर्मनी कोणाच्या बाजूने? संपूर्ण जग चिंतेत!) दरम्यान, नामकरण झालंय हे वस्तुस्थिती नाही. नामकरण झालं तर आम्ही बदलूही शकतो. आम्हीच प्रयागरोज असं नामकरण केलं. त्यामुळे याचंही नामकरण करु. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर आमची जेव्हा सत्ता येईल तेव्हा सर्वात पहिलं काम नामकरणाचं करु. या महाराष्ट्रद्रोही आणि हिंदूद्रोही टिपू सुलतानचं नाव काढून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही त्या जागेला देऊ, असं आमदार अतुल भातखळकर 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया देताना म्हणाले. मैदानात वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल फलक जागोजागी दरम्यान, मालाडच्या क्रीडासंकुल मैदानात वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल फलक जागोजागी असल्याचं बघायला मिळतंय. याबाबत मैदान प्रवेशद्वारावरही अधिकृत फलक आहे. या मैदानाला पोलिसांनी गराडा घातला आहे. या मैदानात सध्या क्रिकेट सामना सुरु आहे. मुंबईच्या अनेक भागातील पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानाच्या नामाकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. पण त्याआधीच भाजपकडून परिसरात आंदोलन सुरु झालंय. पोलिसांनी आंदोलकांना मैदानात जाण्याापासून रोखलं आहे. पोलिसांकडून आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. याशिवाय मैदानाला पोलिसांनी चहुबाजूंनी घेरलं आहे. पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा मैदानाच्या चारही बाजूला आहे. बेस्ट बसची हवा काढली, वाहतूक कोंडी मालाडमध्ये आंदोलन सुरु झाल्यानंतर काही अनपेक्षित घटना घडताना दिसत आहेत. मैदानाजवळ चौकात काही इसमांनी बेस्ट बसच्या चाकांची हवा काढली आहे. ही बेस्ट बस आपल्या मार्गाने जात होती. यावेळी काही जणांनी बेस्ट बस थांबवत चाकांची हवा काढली. विशेष म्हणजे काही जणांनी झोपून बसचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं सुरु आहे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पण बसची हवा ही आंदोलकांनी की गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी काढली? हा प्रश्न उपस्थित होतोय. आंदोलकांची नेमकी भूमिका काय? "भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वात आमचं आज आंदोलन होत आहे. अस्लम शेख यांनी टिपू सुलतान जे एक देशद्रोही आहे त्यांचं नाव मैदानाला देत आहेत हा हिंदूंचा आणि पूर्ण भारतवर्षचा अपमान आहे. जनता आणि भाजप युवा मोर्चा याचा स्वीकार करणार नाही. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रात टीपू सुलतानचं काय योगदान आहे. ही शिवाजी महाराजांची नगरी आहे. शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे", अशी भूमिका आंदोलकांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. कार्यकर्ते रस्त्यावर झोपले मैदानाला टिपू सुलतान यांच्या नामकरणाला विरोध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अनेक आंदोलक थेट रस्त्यावर झोपले आहेत. पोलीस या आंदोलकांना रस्त्यावरुन उठवत आहेत. पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सुरु आहे. या आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या